Type Here to Get Search Results !

भारत-चीन युध्दाचे साक्षीदार माजी सैनिक मच्छिन्द्र चौगुले यांचे निधन


कासेगांव : भारत-चीन युद्धाचे साक्षीदार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील माजी सैनिक मच्छिंद्र बाबू चौगुले यांचे गुरूवारी, २३ मे रोजी वार्धक्यात अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्युसमयी ८६ वर्षीय होते.

१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्यात भरती झालेले मच्छिंद्र चौगुले उपाख्य आबा म्हणून गावात सुपरिचीत होते. त्यांचे भारतीय सैन्यात घडलेले किस्से खूप अभिमानाने नव्या पिढीला सांगायचे. ते प्रचंड देशाभिमानी व अत्यंत मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ओळख होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरोबा वस्ती, कासेगांव येथे प्रत्येक वर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हायचे. बिरोबा वस्तीमधील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. कासेगांव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ. कविता चौगुले यांचे ते सासरे होते. त्याचबरोबर सोसायटीचे माजी संचालक संजय चौगुले यांचे ते वडील होत.