चित्र प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, गजीनृत्याच्या सादरीकरणाबरोबरच विशेष व्याख्यान !
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी, २७ ते ३१ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी दिली.
२७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता सामाजिकशास्त्रे संकुलात खुली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच इतर स्पर्धकांना भाग घेता येईल. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील प्रासंगिक चित्र व क्षण' हा रांगोळी स्पर्धेचा विषय आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास दीड हजार रुपये व पारितोषिक, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या एक हजार रुपये व पारितोषिक व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास सातशे एक रुपये व पारितोषिक असे बक्षीस मिळणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी अडीच तासाचा वेळ राहणार आहे.
बुधवारी, २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता सोलापूर शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. गुरूवारी, ३० मे रोजी सायंकाळी ०४.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात 'मी अहिल्या बोलतेय' या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठातील ललित कला संकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत. व याच दिवशी पाच वाजता डॉ. फडकुले सभागृहासमोर गजी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
शुक्रवारी, ३१ मे सकाळी १०.३० वाजता रोजी विद्यापीठ सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि जेएनयू विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. उमेश अशोक कदम यांचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा वारसा' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे याबरोबरच विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.