बसव सेंटरच्या मानद पदवी पुरस्काराचे थाटात वितरण
पत्रकार प्रशांत माने आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
सोलापूर : बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. ईश्वर निर्गुण, निराकार असल्याचे त्यांनी विचार मांडले. त्यांचे विचार सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांनी केले.
लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवारी सायंकाळी लोकमान्य टिळक सभागृह अँम्पी थिएटर,सोलापूर येथे थाटात पार पडला. यावेळी दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह विविध क्षेत्रातील सात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा या उपस्थित होत्या. यावेळी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ , शेखर लक्ष्मेश्वर, मल्लिनाथ पाटील, नीलकंठप्पा कोनापूरे, पुष्पा गुंगे, लीलावती मडकी, नीलकंठप्पा कोनापुरे, नागनाथ चौगुले, बाबासाहेब कुलकर्णी, पौर्णिमा तोटंद , बसवराज कुलकर्णी आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात शरद ठाकरे पुढे म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असे आहे. तत्कालीन जाती व्यवस्थेविरोधात त्यांनी लढा दिला. मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी उपासना आहे. शारीरिक कष्ट हेच कैलास होय असा संदेश महात्मा बसवेश्वर यांनी दिला. बसव सेंटरचे कार्य गेल्या ४३ वर्षापासून अथकपणे सुरू आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्याचा हा उपक्रम निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. गुणीजनांचा उत्साह वाढविणारा आहे. सत्कारमूर्तींनी त्यांच्या कार्याच्या कक्षा वाढवाव्यात, अशी अपेक्षा शरद ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. बसव सेंटरच्या कार्याचे यावेळी त्यांनी कौतुक केले.
यावेळी सत्कारमूर्तींची भाषणे झाली. याप्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध आणि वचन पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चन्नम्मा केलूर आणि प्रभावती बुट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - गायत्री अघोर, द्वितीय क्रमांक - रेवती धोत्री, तृतीय क्रमांक - नंदिनी शेटे, उत्तेजनार्थ - माधुरी पाटील, वचन पाठांतर स्पर्धा - प्रथम क्रमांक - विजयालक्ष्मी धुम्मा , द्वितीय क्रमांक - लता धनशेट्टी, तृतीय क्रमांक - रत्ना संती आदींना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंगला कोनापुरे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
... या मान्यवरांचा मानद पदवी पुरस्काराने सन्मान !
दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने - आदर्श पत्रकार ,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू लक्ष्मीकांत दायमा - बसवभूषण पुरस्कार,
महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज बोरामणी अध्यक्ष प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी - बसवरत्न,
प्रा. डॉ. शशिकांत पट्टण (पुणे), जयश्री पट्टण, शरणदम्पती,
उद्योजक महादेव कोगनुरे - कायकयोगी,
सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लोके - बसव तत्वश्री,
वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले - आदर्श संस्था
आदींचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.