आज जगभरामध्ये मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईदुल फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जात आहे. प्रथमत: सर्वांना मनापासून मनापर्यंत ईद मुबारक !
ईद म्हणजे खुशी, आनंद...!
ज्यांनी अत्यंत कडक उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास सहन करून केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार महिनाभराचे रोजे पूर्ण केले, त्यांना ईद मुबारक. तरावीहची नमाज नियमितपणे आदा केली त्यांना ईद मुबारक.
रमजान महिन्याचे पालन करताना हजरत पैगंबरांनी प्रत्यक्ष आचरणातून घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण महिना इबादत रोजा, नमाज, तिलावत यामध्ये व्यतीत केला, अशा सर्वांना ईद मुबारक.
लहान-लहान बालकांनी सुद्धा अत्यंत श्रद्धेने रोजे केले त्यांनाही ईद मुबारक.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपण ईद साजरी करू शकलो नव्हतो. अल्लाहच्या कृपेने गेल्या वर्षी ते संकट कमी झालं. सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली आणि म्हणून प्रथमत: त्या परम पवित्र परमेश्वराचे आभार. ज्याने यावर्षी आपल्याला ईद ची खुशी प्रदान केली. आजचा दिवस हा मागचे सर्व काही विसरून नव्या आनंदाने नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. झालेल्या चुका माफ करुन पुन्हा त्या न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे.
समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन प्रत्येकाला आनंद कसा उपभोगता येईल, यासाठी उपाययोजना करून सर्वांना आनंदात सहभागी करून घेण्याचा हा दिवस आहे. ईद साजरी करताना आपल्या देशातील सर्व देश बांधवांना रमजान ईद पवित्र पर्वाच्या शुभेच्छा. या महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी देशातील बंधुभाव वाढवणार्या घटना दृष्टीस पडल्या. मंदिर आणि चर्चमध्ये सुद्धा रोजा इफ्तार चे कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये सर्व देश बांधव सहभागी झाले. सर्वांनी आपली वैभवशाली परंपरा आणि इतिहासाचे अवलोकन करीत भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने गुण्यागोविंदाने राहून हा देश मजबूत करण्याचा संकल्प केला. अशा सर्व देशवासियांना रमजान ईदच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.
आज ईदगाह आणि मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करतांना जगातील समस्त मानव जाती.णच्या कल्याणासाठी दुआ मागितली जाणार आहे. सर्वांना मुबारकबाद देतांना क्षीरखुर्मा चा आस्वाद घेतला जाणार आहे. हा आस्वाद घेताना आपापसातील बंधुभाव आणि स्नेह वृद्धिंगत होणार आहे. हाताची पाच बोटे सारखी नाहीत. त्यामुळे सर्वांचे सुविचार एक सारखे नाहीत, परंतु आज सर्व काही विसरून एकमेकांना अत्यंत प्रेमाने दिलखुलासपणे आपण ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक !
गेली सत्तावीस वर्ष आणि मागील महिनाभर राज्यातील अनेक वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल नी प्रसिद्ध केलेल्या या लेखमालेचे वाचकांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला. बहुमोल प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांना धन्यवाद. पुढील काळामध्ये मागील सत्तावीस वर्षातील सर्व लेखांचे पुस्तक तयार करावं, अशी अनेक मित्रांनी इच्छा व्यक्त केली आहे. पुस्तक रुपाने वाचकांशी संवाद कायम राहील. आजपर्यंत वाचकांनी दिलेल्या बहुमोल प्रतिसादामुळे ही लेखमाला रौप्यमहोत्सवी वर्ष गाठू शकली, याबद्दल निश्चित मला आनंद आहे.
एखाद्या वर्तमान पत्रातील लेखमालेने रौप्य महोत्सव साजरा करावा, ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. हे भाग्य मला प्राप्त झाले. त्याबद्दल दैनिक ... सर्व वाचकांचे व परिवारातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
सत्तावीस वर्षांच्या या प्रवासात ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या असतील त्याबद्दल अल्लाहची आणि आपल्या सर्वांची माफी देखील मागतो.
रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत, बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो, हीच अल्लाहकडे प्रार्थना. मनापासून आभार. शुक्रिया ... शुक्रिया ... अलविदा ... अलविदा ... !
यावर्षी ईद च्या काळातच देशांमध्ये लोकशाहीच्या रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुका होत आहेत.
निवडणुकीच्या माध्यमातून देशातील जनता आपले भावी सरकार,भावी लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. या देशाचा सर्वांगीण विकास आणि देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारं सरकार भविष्य काळामध्ये या देशाला मिळावे, ही देखील या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना. (समाप्त)
सलीमखान पठाण
९२२६४०८०८२