सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पराभवाची चाहूल लागल्याने जातीचं हत्यार उपसलंय. त्यातूनच त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार व्यक्त केलाय. राम सातपुते यांनी फेट्याऐवजी आरएसएस ची चड्डी न घालण्याची प्रतिज्ञा करावी, असं आव्हान अमितकुमार अजनाळकर यांनी दिलंय.
आमदार राम सातपुते यांनी निवडणुकीत विजयी झालो, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा व्यक्त केलीय. त्यावर समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पार्टीने विधिमंडळात दहा टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले. ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे, हे या प्रतिज्ञेआडून मान्य केलंय, असं काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी म्हटलंय.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राम सातपुते आरक्षणाच्या प्रश्नावर काही बोललेत का, असा सवाल करून मराठा समाज भाजपाच्या रणनीतीला पूर्णपणे ओळखून आहे. हा समाज त्यांच्या फसवणुकीच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असेही विनोद भोसले यांनी म्हटलंय.
दरम्यान आमदार सातपुते यांच्या फेटा न बांधण्याच्या प्रतिज्ञेवर अमितकुमार अजनाळकर यांनी सातपुते यांचा खरपूस समाचार घेतलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही भूमिका आमदार सातपुते यांची असती तर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून यासंबंधी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासंबंधी उपमुख्यमंत्र्यांकडे हट्ट धरला असता. आता केवळ मतावर डोळा ठेऊन, त्यांचं हे वक्तव्य आहे.
ते न करता, ... मी फेटा बांधणार नाही, असं म्हणणं म्हणजे मतं मिळवण्यासाठी ते जातीचं कार्ड वापरू पाहणं आहेत. त्यातूनच ते प्रचार सभांच्या माध्यमातून काहीही बोलत आहेत. त्यांना कौन्सिलिंगची गरज असून त्यांनी मानसोपचार तज्ञाकडे जाऊन स्वतःचं समुपदेशन करून झाल्यावर समाजाला आश्वासन द्यावं. या निवडणुकीत त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे मी विजयी झालो तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं म्हटलंय, त्या ऐवजी त्यांनी मी आरएसएस ची चड्डी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करावी, असेही अजनाळकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. याच माध्यमातून माजी नगरसेवक विनोद भोसले यांचाही व्हिडिओ वायरल झालाय.