Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्र्यांचा दौरा... ! जिल्ह्यात नवीन राहण्यास येणाऱ्यांची द्यावी माहिती : अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार


सोलापूर :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ सोलापूर जिल्हा, माढा ४३ लोकसभा अनुषंगाने  ३० एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा माळशिरस येथे आहे. सदर दौऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी एखादी घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये, याकरिता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी, २९ ते ३० एप्रिल या कालावधीत नव्याने राहण्यास येणाऱ्यांची माहिती तात्काळ संबधित पोलीस ठाण्यास  द्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी केले आहे.

जिल्ह्यात नविन राहण्यासाठी येणारे व्यक्ती, याची संपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जी जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल त्या व्यक्तीस व जे कोणी अशा व्यक्तीस जागा उपलब्ध करुन देईल, असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांना अशा अनोळखी नवीन राहवयास आलेल्या व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधिची संपूर्ण माहिती न चुकता तो राहवयास आलेनंतर किंवा विचारपूस केल्यावर लगेच संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी. 

भाडेकरुकडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती घ्याव्यात. एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये, याकरीता स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थसोबत बाळगू नये, तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. 

कोणत्याही अनोळखी नवीन, जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस ठाण्यास त्यांच्या संबंधीची माहिती द्यावी व अशा अनोळखी व्यक्तींना पोलीसांना माहिती न देता जुने वाहन खरेदी विक्री भाड्याने उपलब्ध करून देऊ नये, असंही या आदेशात सांगण्यात आलंय.

हा आदेश २९ व ३० एप्रिल २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हहीत लागू राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिले आहेत.