Type Here to Get Search Results !

यावर्षीच्या खरीप हंगामात आपत्कालीन पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांमध्ये करावी व्यापक जनजागृती : जिल्हाधिकारी

खरीप 2024 हंगामपूर्व आढावा बैठक... !

सोलापूर : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाल्यास जमिनींच्या खोलीनुसार पीक नियोजन, आंतरपीक पध्दतीचा वापर, पिकाची फेरपालट, आवर्षणात तग धरणारी पिके व वाणांचा वापर, पर्यायी पीक व एकात्मिक शेती पध्दतीचा वापर  याविषयी नियोजन करावे. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपत्कालीन पीक नियोजनाबाबत व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

खरीप 2024 हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे बुधवारी, २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, उपसंचालक (कृषी व्यवसाय) मदन मुकणे, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख  श्री. तांबडे, कृषी विभागाचे जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, उपसंचालक पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, रेशिम अधिकारी, जिल्हास्तरीय बँकांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी, कृषी विभागाशी निगडीत सर्व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.


आगामी खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा खरीप हंगामात वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, खते वेळेमध्ये उपलब्ध होतील यांची कृषी विभागाने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

स्वयंचलित हवामान केंद्रासाठी तालुका स्तरावर तहसिलदारांनी तात्काळ जागा उपलबध करुन देण्याचे नियोजन करावे.  जिल्ह्यामध्ये खतांचा बफर स्टॉक वाढवावा.  पीएम किसान योजनेअंतर्गत प्रलंबित ई-केवायसी व आधार सीडेड चे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.   जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, पॉलीहाउस यांना भेटी देणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले.



या बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याबाबतची सदस्थिती याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेऊन आवश्यक सूचनाही दिल्या. 

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी खरीप हंगाम 2024 साठी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत व आवश्यक तेवढा पुरवठा करण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात कोठेही बोगस खते, बियाणे कोणाकडूनही विक्री होऊ नये, यासाठी पथक तयार करण्यात आले असून त्याद्वारे धडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.