Type Here to Get Search Results !

"भारत कधी कधी माझा देश आहे." ला ३७ वर्ष पूर्ण तर "सामना'' झाला ५० वर्षांचा !


साहित्य प्रेमी मंडळाच्या वतीने रविवारी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्याशी गप्पा

सोलापूर : एक व्यंगकवी, विडंबन कवी पटकथाकार आणि दिग्दर्शक रामदास फुटाणे यांची गाजलेली "भारत कधी कधी माझा देश आहे."  ही कविता सोलापुरात निर्माण झाली, या कवितेला आता ३७ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या सामना या चित्रपटाला  ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरच्या साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्याशी रविवारी, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ०६ वा. श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गप्पा-टप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापुरातील उद्योजक आणि साहित्यप्रेमी मंडळाचे प्रमुख दत्ताअण्णा सुरवसे यांनी गुरूवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.

मराठी साहित्यातील कवी, विडंबनकवी, वात्रटिकाकार, चित्रपट दिग्दर्शक. रामदास फुटाणे यांनी मराठीत वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मिती केली आहे. सामाजिक, राजकीय विसंगती दर्शन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असून कटपीस : हिंदी कवितासंग्रह, सफेद टोपी लाल बत्ती : मराठी कवितासंग्रह चांगभलं, भारत कधी कधी माझा देश आहे, फोडणी, कॉकटेल ही ग्रंथसंपदा आहे.

त्यांनी चित्रपट निर्मिती, लेखन, दिग्दर्शन आणि संपादन केलेले चित्रपट सामना, सर्वसाक्षी दिग्दर्शन सुर्वंता, (चित्रपट), झुंड (हिंदी चित्रपट)  साठी लेखन केले आहे. त्यांच्या सांस्कृतिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड या खेडेगावात झाला. बेताचीच आर्थिक परिस्थिती असणाऱ्या शेती व कापडाच्या विक्रीचा आठवडी बाजार करणार्‍या संयुक्त कुटुंबात जन्मलेल्या रामदास फुटाणे यांनी गोरगरीब खेडूत लोकांच्या मनात सलणारे दु:ख कवितेतून मांडले.

 "भारत कधी कधी माझा देश आहे " हा मराठी कवितासंग्रह सन १९९७ ला सोलापुरात प्रकाशित झाला आणि त्यांना ही कविता सोलापुरातच सुचली या कवितेला ३७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच सामना या चित्रपट लेखनाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामदास फुटाणे यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहितीही नव्याने स्थापण्यात आलेल्या साहित्य प्रेमी मंडळाचे उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे यांनी दिली. 

या पत्रकार परिषदेला डॉ. श्रीकांत येळेगांवकर, संयोजक पद्माकर कुलकर्णी, कवी मारुती कटकधोंड यांची उपस्थिती होती.