सोलापूर : पोलीस आयुक्तालय, शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाहन चोरीचे चार गुन्हे उघड करण्यात यश आलंय. १२ एप्रिल च्या सकाळपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सन सिटी विंग बी ०२ च्या पार्किंग मधून टोयोटा कंपनीची ग्लांझा कार चोरून नेली होती. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी दशरथ गायकवाड (वय-२५ वर्ष) याला गजाआड केले. तो १५ एप्रिल रोजी चोरलेली कार विक्रीकरिता घेऊन आला असताना त्यास ताब्यात घेण्यात आले.
११ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर मंगेश भारत जाधव (रा. फ्लॅट नंबर ३०२, सनसिटी, विंग बी २, सोलापूर) यांची टोयोटो कंपनीची ग्लांझा कार क्रमांक- एम.एच १३ डी.टी २४४८ ही, त्यांचे राहते अपार्टमेंन्टचे पार्कीग मधून, अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, आजुबाजूचे सुमारे २० सी सी टी व्हि फुटेज ची पडताळणी करून, अज्ञात आरोपीची ओळख पटविली. त्यानंतर विकी दशरथ गायकवाड (रा. सेटलमेंन्ट फ्रि कॉलनी नंबर ०६, कृष्ण मंदिर जवळ, सोलापूर) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून टोयोटो ग्लांझा कार क्रमांक एम एच १३ डी टी २४४८ ही २,५०,००० रूपये किंमतीची जप्त करण्यात आलीय.
त्याचप्रमाणे, १४ एप्रिल रोजी, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकास, मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे सिध्दाराम चंद्रशा हिरकूर (वय ३६ वर्षे, सध्या रा. प्लॉट नं. १५, राघवेंद्र नगर, मजरेवाडी, सोलापूर) यास ताब्यात घेवून, त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची ३५,००० रूपये किंमतीची मोटार सायकल (क्र. MH 13 DG 4009) ही जप्त करण्यात आलीय. याप्रकरणी सदर बझार पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे.
या पथकाला मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे राजकुमार उर्फ राजु शिवानंद बिराजदार (वय ३९ वर्षे, सध्या रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर, कायम रा. २४, दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यास ताब्यात घेऊन, त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली अॅक्टीव्हा कंपनीची २५,००० रूपये किंमतीची मोटार सायकल (क्र. MH 13 AG 6779) जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंद असून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोउनि शेख व त्यांच्या पथकास यश आलंय.
१३ एप्रिल रोजी सुशांत चंद्रकांत लोखंडे यांची, यामाह कंपनीची आर- १५ मोटार सायकल (एम.एच.१३ डी. जे. ७०७०) ही त्यांच्या राहत्याघरापासून चोरी झाली होती. १५ एप्रिल रोजी, सपोनि दादासो मोरे व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या बातमीचे आधारे मोहम्मद शरीफ बागवान (वय-२६ वर्षे, रा.३७०/२०, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून यामाह कंपनीची ०१ लाख रूपये किंमतीची मोटार सायकल (क्रमांक एम.एच.१३ डी. जे.७०७०) जप्त करण्यात आलीय.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी ०४ आरोपींकडून, ०१ कार आणि ०३ मोटार सायकल जप्त केल्या. यात चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस येऊन, ०४,१०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./संजय क्षिरसागर, स.पो.नि./ दादासो मोरे, पो.उप.नि./अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.