सोलापूर : आज देखील आपल्या देशात अनेक लोक उपाशीपोटी झोपतात. त्यांना एक वेळचे अन्न देखील मिळत नाही. आपण शिकलो, सवरलो मोठे झालो म्हणून समाजाकडे पाठ फिरवायची नसते. आपल्या कमाईचा एक हिस्सा गोर-गरीब, निराधार, वंचित, उपेक्षित, सामाजिक दुर्बल घटकासाठी राखून ठेवावा. त्यांना एक वेळचे अन्न उपलब्ध करून दिल्यास पुण्य लाभते, असं प्रतिपादन इम्प्रेसोना समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका कमल शहा यांनी केले.
योगा विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रा, मास्टर चोवा कोक सुई व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने फूड फॉर हंगरी या संकल्पनेतून निराधार, सामाजिक दुर्बल घटकातील महिला व पुरुषांना धान्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन दयानंद कॉलेज रस्त्यावरील भवानी पेठेतील फॅमिली प्लँनिंगच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन डॉ. एन. बी. तेली, एफ. पी. ए. आय. सोलापूर शाखेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मधुकर लोखंडे, सिद्धाराम कोतली, संगमेश्वर रघोजी, युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. याप्रसंगी इम्प्रेसोना समुपदेशन केंद्राच्या समुपदेशीका कमल शहा बोलत होत्या.
यावेळी सोलापूर शहराच्या विविध भागातील गोर-गरीब, निराधार, वंचित, उपेक्षित, सामाजिक दुर्बल घटकातील ३० महिला व पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.
डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना योगा विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रा, मास्टर चोवा कोक सुई या संस्थांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले तर ऐश्वर्या सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी :
योगा विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रा, मास्टर चोवा कोक सुई व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या वतीने सामाजिक दुर्बल घटकातील लोकांना धान्य वाटप करताना कमल शहा, डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ.एन.बी.तेली, डॉ. मधुकर लोखंडे, सिद्धाराम कोतली, संगमेश्वर रघोजी, ऐश्वर्या सावंत, सुगतरत्न गायकवाड, वीरेंद्र परदेशी आदी छायाचित्रात दिसत आहेत.