कासेगांव : संजय पवार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दीन-दलित, वंचित समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची टाकले, त्यांचा आदर्श नवीन शालेय शिकणाऱ्या विद्यार्थिनी घ्यावा, शिक्षणातून समाज प्रबोधन आणि समाज क्रांती घडवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगांव येथील क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी वरळेगांवचे माजी सरपंच श्रीमंत हक्के, पोलीस पाटील विकास लक्के, ग्रामपंचायत सदस्य शामराव मळगे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष किशोर चौधरी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने सामाजिक समता, बंधुता व एकात्मता यांच्याविषयी जो समाजामध्ये एकतेचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या संकल्पनेतून व त्यांना स्मरून संपूर्ण भारतीयाला समानतेमध्ये आणण्यासाठी संविधानाची निर्मिती करून दीन-दलित,गोरगरीब असा भेदभाव न करता सर्व समावेशक असा मसुदा तयार करून ते संविधान आपल्या देशाला प्रदान केले.
त्यामुळेच आज गोरगरीब लोकांना आर्थिक क्षमतेनुसार आरक्षणाचा लाभ घेता येतोय, सामाजिक असहिष्णुता कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वेचले. यातूनच त्यांनी 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' अशी शिकवण त्यांनी वंचित पिडित समाज घटकाला दिली. यामुळेच चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल, सत्यशोधक परिषद असेल अशा अनेक चळवळी तयार झाल्या. अशा या महान महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो, असेही किशोर चौधरी यांनी शेवटी म्हटले.
यावेळी वरळेगावचे ग्रामसेवक स्वामी, यशवंत सोडगे, मोहन भगत, राजू काटकर, ज्येष्ठ नागरिक भीमराव वाघ, वामन चौधरी, धोंडीराम चौधरी, प्रकाश हक्के, बापू गोसावी, महादेव वाघ, शुभम काटकर, गणेश भगत, सोमनाथ कवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, गावातील अन्य नागरिक उपस्थित होते.