सोलापूर : शहर व जिल्ह्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणूक एक आकर्षण ठरलीय. या मिरवणुकीतील उत्साह अन् जल्लोष आपल्या नयनात साठवण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती भागातूनही येणाऱ्या जणू जनसागर म्हणून पाहिलं जातं. या जनसागरातील लक्ष-लक्ष नयनांनी येथील विश्वरत्न डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीचा उत्साह अन् जल्लोष अनुभवला.
रविवारी, १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिवस होता. त्या दिवशी समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं. जयंती दिनांकापासून येणाऱ्या पहिल्या रविवारी, भव्य दिव्य रोषणाई आणि देखावे तयार शहरातील लहान- मोठे जवळपास ४०० हून अधिक मंडळे, सामाजिक संस्था या मिरवणुकीत सहभागी होत असतो.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येणारा प्रत्येक माणूस त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मिरवणुकीची उत्साह आणि जल्लोष अनुभवत होता रविवारी दुपारी साधारण गर्दी असलेला पार्क चौक सायंकाळी माणसांच्या गर्दीने फुलून गेला होता, जणू जनसागर उसळल्याचा प्रत्यय येत होता.
यंदाच्या मिरवणुकीत बहुतांशी मंडळांनी देखावे सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख प्रसंगावर देखावे सादर करीत असताना संविधानावरील आधारित देखावे अधिक प्रमाणात दिसून येत होते. जी. एम. सामाजिक संस्था, प्रबुद्ध भारत तरूण मंडळानं ' संविधानामुळे समानतेचा ' लक्ष वेधक देखावे सादर केले होते. बहुतांशी मंडळांनी डीजे, बेस ही अत्याधुनिक वाद्यवृंद लावलेली असली तरी काही मंडळांचा कल पारंपारिक वाद्याकडे असल्याचे दिसून येत होते आणि जयजयकार होता तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ... !
प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या दिमाखदार मिरवणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुतेही थिरकले. बुध्द भूमी सामाजिक संस्थेने आपलं संविधान आपला स्वाभिमान हा देखावा तयार केला होता. मिरवणुकीत आर जी संस्थेने सादर केलेल्या देखाव्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लक्ष वेधून घेत होता. सोलापूर शहर पोलिसांनी या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे दिसून आले. मध्यरात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालतील असे या निळ्या जनसागराच्या गर्दीवरुन दिसून येत होते.