Type Here to Get Search Results !

पाटील... , तुमचा महासंघ म्हणजे सर्व कोळी समाज नाही : गणेश अंकुशराव


पंढरपूर : ‘‘ कोळी महासंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला संपूर्ण कोळी समाज नाही. जिल्ह्यातल्या कोणत्याही समाज बांधवांना विश्वासात न घेता लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणारे आमदार रमेश पाटील कोण? " असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केलाय.

महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी, कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आ. रमेश पाटील, सोलापूर जिल्ह्यातल्या अथवा महाराष्ट्रातल्या आदिवासी कोळी समाजाचे मालक नाहीत.’’ असा खणखणीत इशारा त्यांनी दिलाय. 

कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आ.रमेश पाटील यांना दिला आहे. कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील हे २५ एप्रिलला सोलापूरमध्ये आले, तेव्हा त्यांनी समाजाच्या प्रश्नाचे ज्ञान नसणार्‍या एका अज्ञानी कार्यकर्त्याला माध्यमातून कार्यक्रम घेऊन भाजपाचे उमेदवारास लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

आमदार रमेश पाटील यांनी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणत्राचा प्रश्न सोडवतो, म्हणून भाजपाकडून आमदारकी पदरात पाडून घेतली आहे. प्रश्न मात्र सोडवला नसल्यामुळे समाजाची फसगत झालीय. त्यांना नेता म्हणून समाज मान्यता नाही. आमदार रमेश पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातल्या प्रश्नांचं ज्ञान नाही. 

त्यांनी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्या मर्जीतले कांही कार्यकर्ते ठेवलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुका आल्या की, महाराष्ट्रभर फिरून पाठिंबा दिल्याचे पक्षाला दाखवतात. त्यांच्या भाषणामध्ये फक्त मोदींसाठी भाजपाला मतदान द्या, असे म्हणत आहेत. समाजाच्या प्रश्नाविषयी त्यांनी वाच्यताही केलेली नाही. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र कोळी जमातीच्या अस्मितेचा विषय आहे, अशा संवेदनशील प्रश्नावरती त्यांनी वाच्यता केलेली नाही.

२०१४ व २०१९ ला राज्याच्या ३१ जिल्ह्यातील ४५ लाख कोळी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला मत देऊन सत्तेत आणले होते, तरी गेल्या १० वर्षांमध्ये कोळी समाजाच्या संवेदनशील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांनी वेळ दिलेली नाही. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला आले असता, सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ दिली, मात्र जिल्ह्यातल्या महादेव कोळी समाजाच्या प्रतिनिधीला वेळ देण्याऐवजी अपमानित केलंय. कोळी समाज या अवमानाचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. 

आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक मंजुरी मिळूनही अद्याप झाले नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्याकडे लक्ष दिले तर भाजपाने कोळी समाजावर केलेला अन्याय ठळकपणे दिसून येईल. त्यामुळे भाजपानेही आता कोळी समाजाला गृहीत धरू नये, तसेच आमदार रमेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता,  सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाज बांधवासह संबंध महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या मतदार बंधु-भगिनींनी जागरूकतेनं मतदान करावं, असे आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलंय.