सोलापूर : मोटार सायकलीवरुन डबलसिट आलेल्या अनोळखी दोन इसमांनी ते पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याच्या सरकारी किंमतीनुसार एक लाखाची फसवणूक केलीय. ही घटना बुधवारी सायंकाळी येथील ७० फुट भाजी मार्केट ते कुमठा नाका दरम्यान घडलीय. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ७० फुट रोड,स्वागत नगर रस्त्यावरील नागेंद्र नगरातील रहिवासी, बळीराम शिवाजीराव एकडे (वय ७४ वर्षे) या जेष्ठ नागरिकास मोटरसायकलीवर आलेल्या जोडगोळीने रस्त्यात थांबवून ते पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांनी बळीराम इकडे यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी व ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे सोन्याचे दागिने प्रारंभी काढण्यास भाग पाडले.
ते दागिने बळीराम एकडे यांना बॅगमध्ये ठेवतो, असे म्हणून बॅगमध्ये हात घातला, परंतु त्यांनी ते दागीने बॅगमध्ये न ठेवता घेऊन जावून त्यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी त्या जोडगोळीविरुद्ध भादवि सं ४२०,१७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.