माढा : सध्या देशात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशातील प्रस्थापित पक्षांमध्ये उमदेवारीवरून शह-काटशह सुरू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष माढा मतदारसंघावर आहे. भाजपाने त्यांच्या उमेदवार निश्चित केला असून महाविकास आघाडीचा एक चेहरा रविवारी महायुतीत सहभागी झालाय. यामुळे महाविकास आघाडी बॅक फुटवर आलीय. अशातच बहुजन मुक्ती पार्टीने माढ्यात काकासाहेब जाधव यांना उमेदवारी जाहीर करुन माढ्यात नवा ट्विस्ट निर्माण केलाय, मात्र जाधव यांच्या उमेदवारीनं ओबीसींसह भटक्या-विमुक्तांना हक्काचा माणूस भेटल्याचं बोललं जातंय.
काकासाहेब जाधव यांनी २०१४ व २०१९ ला माढ्यातुन निवडणूक लढवलीय. त्यांनी गावामध्ये स्वतंत्र पॅनल देऊन सत्ताधारी आणि विरोधक यांना चांगलाच घाम फोडला होता. त्यांचा भटक्या-विमुक्त समाजात मोठा संपर्क आहेच, त्याचबरोबर शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग काकासाहेब जाधवांबरोबर आहे.
जाधव यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष अनेक गावांशी संपर्क निर्माण केला आहे. OBC ,SC, भटके-विमुक्त आणि मुस्लिम मतदार काकासाहेब जाधव यांच्याकडं खेचला जाऊ शकतो. याचा मोठा फटका महायुती अन् महाविकास आघाडीला बसू शकतो, अशी स्थिती आहे.
काकासाहेब, यावर्षी विजय निश्चित का ?
काकासाहेबांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुका पडण्यासाठी लढलो पण या निवडणुकीत कोणाला तरी पाडल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघात माझा समाज आणि विचारांचा निर्णायक मतदार आहे. माळशिरस तालुक्यात समाजाचे ५५ ग्रामपंचायत सदस्य आहेत.
माढा, सांगोला, करमाळा विधानसभा मतदार संघातसुध्दा सदस्यांची मोठी संख्या आहे. माण-खटाव व फलटण विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाज बांधव राहत आहेत, यामुळे माझ्याकडे चांगला बेस व्होट असून कोल्हापूर, हातकंणगले, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बारामती, माढा अशा महत्वाच्या मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीने ओबीसी व भटक्या विमुक्तांना डावलल्याचे दिसून येत आहे.
अशावेळी बहुजन मुक्ती पार्टीने काकासाहेब यांना उमेदवारी जाहीर करुन या समुहाची सहानुभुती मिळवली आहे. ओबीसी व भटक्या-विमुक्तमधून काकासाहेब जाधव एकमेव उमेदवार आहेत.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी अगोदरच कोल्हापूर, बारामती व अकोला वगळता उर्वरीत जागेवर बहुजन मुक्ती पार्टीला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे भारत मुक्ती मोर्चा आणि त्याच्या ऑफशूट विंगचा ही फायदा या उमेदवारास मिळू शकतो. काकासाहेब यांचं सामाजिक काम वाखणण्याजोगे असल्यामुळे अनेक सामाजिक संघटना काकासाहेब जाधव यांच्या पाठीशी ठामपणे ऊभ्या राहतील, असंही काकासाहेब जाधव यांनी म्हटलंय.