Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यापेक्षा अधिक झाली पाहिजे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सोलापूर जिल्ह्यात जवळपास ६१ टक्के मतदान झालेले होते, परंतु ही मतदानाची टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याने या लोकसभा निवडणुकीत ७० टक्के पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील निवडणुकीत सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी जवळपास ५३ टक्के इतकीच होती. तरी सोलापूर शहरातील रे नगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य  गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.



जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत रे नगर गृहनिर्माण संस्था मतदान टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवडणूक तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, प्रवीण घम, रे नगर हाऊसिंग सोसायटीचे प्रवर्तक नरसय्या आडम, चेअरमन श्रीमती नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, नरसिंग म्हेत्रे,  सुनंदा बल्ला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विशेषत: सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत खूपच कमी होती. सोलापूर शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थामधील सदस्यांचे मतदान होण्यासाठी संबंधित संस्थेच्या चेअरमन व सचिव आणि प्रत्येक सदस्यांचे मतदान कार्ड आहेत का? याची तपासणी करावी, नसतील त्या सदस्यांचे फॉर्म नंबर ६ भरून घेऊन मतदान कार्ड काढावे. तसेच नव मतदार व अन्य सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या वतीने सर्व सदस्यांना आवाहन करावे.  त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांच्या स्तरावर करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ टक्के पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. त्यासाठी बीएलओ मार्फत फॉर्म नंबर १२ ड ८५ पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना देण्यात येणार असून त्यांच्याकडून घरून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार हा पर्याय भरून घेतले जाणार आहे. दोन्हीपैकी एक पर्याय दिल्यानंतर त्याच पर्याय नुसार मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. परंतु ज्या वयस्कर मतदारांना चालता येत आहे, त्या मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे व इतर तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही त्यांनी केले.



रे नगर सोसायटीचे प्रवर्तक आडम म्हणाले , रे नगरसह अन्य गृहनिर्माण संस्थाचे एकूण ७० हजार सदस्य शहरात आहेत. या संस्थेतील सर्व सदस्यांना मतदानाच्या पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रबोधन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चेअरमन श्रीमती कलबुर्गी यांनी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य तसेच कामगार विशेषत: महिला वर्गांचेही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सचिव युसूफ शेख यांनी मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी कामगार व मजुरांना मिळाली पाहिजे, अशी मागणी केली.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मतदान जागृतीबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली.