Type Here to Get Search Results !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारूवर ०४ विशेष पथकांची कारवाई ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त


सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या संदर्भाने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील अवैध दारू निर्मीती व विक्री यांवर कारवाई करण्यासाठी ०४ विशेष पथकं नेमण्यात आलेत. या पथकांनी गेल्या पंधरवड्यात २२ गुन्हे दाखल करून सुमारे १० लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केलाय. पथकात  १ पोलीस पोलीस निरीक्षक, २ सपोनि/पोउपनि यांच्यासह आवश्यक पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे.

त्यामध्ये, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी पो.नि. बालाजी कुकडे (नियंत्रण कक्ष), करमाळा तालुक्यासाठी पो.नि. कलमलाकर पाटील (जिल्हा वाहतूक शाखा), अक्कलकोट तालुक्यासाठी पो.नि. संजय जगताप, (आर्थिक गुन्हे शाखा), व पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी पो.नि. बजरंग साळुंखे (अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, सोलापूर) यांच्या नेतृत्वाखाली ०४ पथकं नेमण्यात आलीत.

या पथकांनी मागील १५ दिवसामध्ये मुळेगाव तांडा, भानुदास तांडा, गुळवंची तांडा, बक्षी हिप्परगा, तिल्हाळ, अक्क्कलकोट तालुक्यातील तडवळ, भोसगा तांडा, नागूर तांडा, मुंढेवाडी येथे तर माळशिरस तालुक्यातील सवत गव्हाण, गुरसाळे, श्रीपूर, धर्मपुरी, चव्हाणवाडी येथे तसेच करमाळा तालुक्यातील शेळगाव, जेऊर, सुगाव, भाळवणी येथे सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्टयांवर कारवाई करण्यात आलीय.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या पथकाने ०९ गुन्हे दाखल करून १५ आरोपीविरुद्ध कारवाई केलीय. त्यांच्या ताब्यातून २०५ लिटर हातभट्टी दारू आणि १६, ७०० लिटर गुळ मिश्रीत रसायन जप्त करण्यात आले. त्याची सरकारी किंमत अनुक्रमे ०८, ०९, ०५० रुपये आहे. 



अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने ०६ गुन्हे दाखल करून ०६ आरोपींविरुद्ध कारवाई केलीय. त्यांच्या ताब्यातून ८० लिटर हातभट्टी दारू आणि २, ००० लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आलंय, त्याची किंमत ७६, ५०० रुपये इतकी आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने ०४ गुन्हे दाखल करून ०४ आरोपीविरूध्द कारवाई केलीय. त्यांच्या ताब्यातून ११५ लिटर हातभट्टी दारू आणि १, ५५० पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. त्याची सरकारी किंमत ७१, ३३० रूपये आहे तर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या पथकाने ०३ गुन्हे दाखल केले, त्यात ०६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आलीय, त्यांच्या ताब्यातून ३० लिटर हातभट्टी दारू व १५०० लिटर गुळ मिश्रीत रसायन जप्त करण्यात आले. त्याची सरकारी किंमत ५०, १७० रुपये असावी, असा अंदाज आहे.या चार पथकांनी २२ गुन्हे दाखल केले असून ३१ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आलीय. त्यांच्या ताब्यातून ४, ३० लिटर हातभट्टी दारू आणि २६, ४५० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले, यात १०, ०७, ०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

या विशेष पथकांमार्फत जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध दारू विक्रीवर लोकसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.