Type Here to Get Search Results !

शहर गुन्हे शाखेच्या छाप्यात ७७ किलो गांजा जप्त किंमत १५,५०,३८० रुपये; आरोपीस २ दिवसांची कोठडी

 

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात ७७ किलोहून अधिक वजनाचा आणि १५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी अजित सुखदेव जगताप (मूळ राहणार सोहाळे) अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी दिलीय.

सोलापुरात गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना, गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना २६ मार्च रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार "इसम नामे अजित सुखदेव जगताप, हा सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करीत आहे. सध्या त्याचे या घराबरोबरच त्याचे मुळ गाव मोहोळ तालुक्यातील मु.पो. सोहाळे येथील घर असे दोन्ही घरामध्ये गांजाचा साठा आहे" अशी खबर मिळाली होती.

 त्यानुसार एन.डी. पी.एस. कायद्यातील तरतुदीप्रमाणे, श्रीमती प्रांजली सोनवणे (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे) यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि संजय क्षिरसागर, पोसई अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी दोन्ही ठिकाणी छापे टाकले. 

या छाप्यात अजित सुखदेव जगताप याच्या दोन्ही घरांमध्ये १५,५०,३८० रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आला.  हा गांजा जप्त करुन, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात अजित सुखदेव जगताप यास अटक करण्यात आली असुन, त्यास न्यायालयाने ०२ दिवस पोलीस कोठडी दिलीय. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/संजय क्षिरसागर, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, वसिम शेख, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सायबर पोलीस ठाणेकडील-अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.