◾️आदर्श आचारसंहिता कक्षामार्फत आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील
◾️१२ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार
◾️सोलापूर जिल्ह्यात एकूण ३६, २७,०७५ मतदार, तर ३, ६१७ मतदान केंद्राची संख्या
◾️निवडणुकीसाठी २१, ३१० निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून ४२, सोलापूर (अनु. जाती) व ४३, माढा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून जिल्ह्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह इंडियन नॅशनल कॉग्रेसचे मनिष गडदे, नंदकुमार पवार, भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेना ठाकरे गटाचे जरगीस मुल्ला, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे नरसिंग म्हेत्रे, मोहन कोकूल, राष्ट्रवादी पार्टीचे (अजित पवार) संतोष जाधव, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, आम आदमी पार्टीचे खतीब वकील, बसपाचे शिलवंत काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष यांनी आदर्श आचारसंहितांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने संबंधिताविरूध्द तात्काळ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
तसेच भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल, मतदानाची तारीख ०७ मे तर मतांची मोजणी ०४ जून आणि निवडणूक प्रक्रिया ०६ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ आहेत, ४२, सोलापूर (अ.जा.) व ४३, माढा असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. सोलापूर जिल्ह्यात पुरुष मतदार १८, ७६, ४९८, स्त्री मतदार १७, ५०, २९७ व इतर मतदार २८० असे एकूण ३६, २७, ०७५ एवढे मतदार व ४, ५९१ सैनिक मतदार आहेत. जिल्ह्याचा मतदाराची सरासरी दि १५ मार्च २०२४ रोजी ७६.७४ टक्के एवढा आहे. मतदारांची लिंग गुणोत्तर हा ९३३ आहे. जिल्ह्यामध्ये १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ५२, ७८३ असून २०-२९ वयोगटातील मतदार हे ७, १२, १४७ इतके आहेत.
८५ वर्षावरील मतदारांची संख्या ही ५४, ९९१ असून दिव्यांग मतदार संख्या ही २७, १९४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र ३५९९ (शहरी १२४३ व ग्रामीण २३५६) व १८ सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण ३, ६१७ मतदान केंद्रे आहेत. तसेच ३, ५९९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. जिल्ह्यामध्ये ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण ८, ५१८ बॅलेट युनिट, ४९०३ कंट्रोल युनिट व ५२७६ VVPAT इतक्या EVM ची प्रथमस्तरीय तपासणी करून त्या पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
आचार संहिते बाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C- vigil app वापरावे, तसेच cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी एक कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली असून तिथे १९५० हा टोल फ्री नंबर हा activate करण्यात येत आहे. या कंट्रोल रूम मधून सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूक यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे. तसेच निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्षांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी सांगितले
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार यांनी राजकीय पक्षानी आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीची सविस्तर माहिती दिली. तर खर्च समितीच्या नोडल अधिकारी श्रीमती वाकडे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा असल्याचे सांगून खर्च समितीने निवडणूक कालावधीत उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने सर्व दर तयार करून ते सर्व राजकीय पक्षांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. पेड न्यूज व जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याच्या अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के यांनी सविस्तर माहिती दिली.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी एक खिडकी व विविध परवानगीच्या अनुषंगाने आपल्या समस्या मांडून प्रशासनाने त्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली. तसेच राजकीय पक्षांच्या सभा घेण्यासाठी सोलापूर शहर, जिल्ह्याचा नागरी भाग तसेच ग्रामीण भागातील शासकीय मैदाने मागणी केल्यानंतर विहित नियमावली प्रमाणे वेळेत उपलब्ध करून देण्याचे ही मागणी करण्यात आली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षाच्या वतीने पालन करण्यात येईल, असेही यावेळी सर्व प्रतिनिधींनी सांगितले.
............ चौकट ........
४२, सोलापूर व ४३, माढा लोकसभा मतदार संघातील
विधानसभा मतदार संघ निहायची सविस्तर माहिती
२४४, करमाळा मतदार संघामध्ये ३४२ मतदान केंद्र असून ३ लाख १६, ४६७ मतदार आहेत. २४५, माढा मतदार संघामध्ये ३४१ मतदान केंद असून ३, ३५, ३४२ मतदार आहेत. २४६, बार्शी मतदार संघामध्ये ३२९ मतदान केंद्र एकूण मतदार ३, १९, ४२६ मतदार आहेत. २४७, मोहोळ (अ.जा) मतदार संघामध्ये ३३१ मतदान केंद्र ३, १७, ८३९ मतदार आहेत. २४९, सोलापूर शहर मध्ये २९१ मतदान केंद्र ३, २१, ३९३ मतदार आहेत, २४८ सोलापूर शहर उत्तर मतदार संघामध्ये २७८ मतदान केंद्र ३, ०७, ६६७ मतदार आहेत, २५० अक्कलकोट मतदान संघामध्ये ३७४ मतदान केंद्र ३, ५६, ५०९ मतदार आहेत, २५१ सोलापूर दक्षिण मतदार संघामध्ये ३५७ मतदान केंद्र ३, ५१, २५३ मतदार आहेत, २५२, पंढरपूर मतदार संघामध्ये ३३७ मतदान केंद्र ३, ५४, ८६१ मतदार आहेत, २५३, सांगोला मतदार संघामध्ये २९९ मतदान केंद्र ३, १०, ४४१ मतदार आहेत, २५४, माळशिरस मतदार संघामध्ये ३३८ मतदान केंद्र तर ३, ३५, ८७७ मतदार आहेत.
....... चौकट ......
सोलापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी
२१, ३१० अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मतदान केंद्रासाठी २१, ३१० अधिकारी व कर्मचारी, खर्चाच्या देखरेखीसाठी ८०५ कर्मचारी, २१८ व्हिडिओग्राफरची संख्या, सूक्ष्म निरीक्षक ४५५, सेक्टर ऑफिसर ३६६, स्टॅटिक सर्व्हिलन्ससाठी ४८ पथके, फ्लाइंग स्क्वॉड ४६ पथके, ४८ पथके व्हिडिओ पाळत ठेवण्यासाठी, व्हिडिओ पाहणाऱ्या पथकांची संख्या १३, खाते कामासाठी ११ पथके स्थापन करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगीतले.