मुख्याध्यापिका, संस्थाध्यक्ष आणि माल घेऊ पाहणारा व्यापारी गोत्यात
सोलापूर : शालेय पोषण आहार शासकीय प्रणालीतील तांदूळ, मूग, डाळ, मटकी, तेल पाकिटे आदी साहित्य विद्यार्थ्यांना वितरीत करण्याऐवजी ते काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या प्रयत्नानं, विडी घरकुलातील राजश्री शाहू प्राथमिक शाळा सध्या चर्चेत आहे. या शाळेच्या संस्थाध्यक्ष व संबंधित व्यापाऱ्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुना विडी घरकुलातील राजश्री शाहू प्राथमिक विद्यालयात शालेय पोषण आहार प्रणालीत शासनाने पुरविलेलं धान्य, १८ ते २० वयोगटातील ०२ मुलं बाहेर विकण्यासाठी गाडीत भरीत आहे, अशी माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या शाळेकडं मोर्चा वळविला. त्या ठिकाणी एम एच १३/ सीटी ८६१७ क्रमांकाच्या अॅपे रिक्षामध्ये शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ, बारदाणे, मटकीचे पोते, मुग डाळ चे पोते २५ तेल पाकिटे असं अन्नधान्य भरले जात असल्याचे दिसून आले.
उभयतांकडे चौकशी करून पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या मुलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीतून खळबळजनक माहिती पुढं आलीय. त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचं अन्न-धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी त्यांना कॉल करून बोलाऊन घेतलं होतं.
मुख्याध्यापिका महानंदा यांनी संस्था अध्यक्षांच्या सांगण्यावरून शाळेच्या आवारातील पत्राच्या शेडमधील शालेय पोषण आहार प्रणालीतील अन्नधान्य मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिले आहे, असं सांगितलं. पोलिसांनी त्या मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेला असताना शालेय पोषण आहार शासकीय प्रणालीतील अन्नधान्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, संस्थाध्यक्ष आणि माल घेऊ पाहणारा व्यापारी गोत्यात आले आहेत.