सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अधिकारी, ठेकेदार आणि माजी नगरसेवक यांच्या यांची नियोजन शून्य. कामांचा त्रास भवानी पेठ परिसरातील नागरिकांना सोसावा लागतोय. त्यांच्या घरा-दारात गटारीचे घाण पाणी येत असल्याने त्याचा निषेध नोंदविण्यासाठी विश्वभूषण कांबळे यांनी अंगणात साचलेल्या घाण पाण्यात बसून आंदोलन केलं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने न पाहिल्यास आयुक्तांच्या कार्यालयात हेच पाणी आणून ओतणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
दाट लोक वस्ती अशी ओळख असलेल्या भवानी पेठ परिसरामधील मराठा वस्ती, मुकुंद नगर, राजीव गांधी नगर, जम्मा वस्ती, बसवंती प्लॉट, या ठिकाणी हजारोंच्या संख्येने राहत असलेल्या नागरिकांच्या सुविधेसाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर याकडे महानगरपालिकेतील अधिकारी लोकप्रतिनिधींनी कधीही पाहिले नाही.
गेल्या दहा वर्षात या परिसरातील नगरसेवकांनी भवानी पेठ परिसरात ड्रेनेजची समस्या लक्षात घेऊन कोणतीही कामे केली नाहीत. या काळात नगरसेवकांनी मंजूर झालेला निधी कोठे खर्ची टाकला याचा उलगडा झालेला नाही. त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयाकरिता मंजूर झालेला ८.५० लाखाचा निधी कोठे खर्ची पडला हेही दिसून आले नाही.
आज गटारीतील घाण पाण्याने नागरिकांच्या घरातील स्वयंपाक घरापर्यंत मजल मारली असून पिण्याच्या पाण्यात गटारीचे घाण पाणी जात आहे.परिसरात अन् घराघरात शेपटीच्या अळ्या व रोगराई पसरत आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याची विश्वभूषण कांबळे यांची तक्रार आहे. कांबळे यांनी २९ फेब्रुवारी रोजी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज म.न.पा आयुक्तांकडे दिला. त्यावर चौकशी व कारवाई अद्याप झालेली नाही. मनपा आयुक्त या गंभीर विषयाकडे डोळसपणे पहात नसल्याने ते ठेकेदाराला पाठीशी घालताहेत की काय असा कांबळे यांचा सवाल आहे.
या परिसरातील अपूर्ण कामे तात्काळ काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा भवानी पेठमधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिनमध्ये ओतणार, असा इशारा भवानी पेठ मधल्या नागरिकांनी दिला आहे. त्याच गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून विश्वभूषण कांबळे यांनी आंदोलन करून निषेध नोंदवितांना तीव्र नाराजी व्यक्त केलीय.