सोलापूर : व्यवहारात विश्वास संपादन केलेल्या दोन पुणेरी व्यापाऱ्यांनी सोलापुरी व्यापाऱ्याला ३६ लाख रुपयांची टोपी घातलीय. हा प्रकार १३ जून २०२२ रोजी ते दि. ११ सप्टेंबर २०२२ या दरम्यान घडला. उभयताकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ केल्याने आदित्य पुरुषोत्तम पडसलगी या व्यापाऱ्यानं एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार ठकसेन व्यापाऱ्याविरुद्ध ३६ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील न्यू पाच्छा पेठ, पद्मा नगरातील रहिवासी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी यांचा पडसलगी टेक्सटाईल एजन्सी या नावाने टॉवेल, चादर, ब्लॅकेट, बेडशीट इ. कमीशनवर विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
आदित्य पडसलगी यांनी १३ जून २०२२ रोजी ते दि. ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडुन माल घेऊन तो पुण्यातील व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी (रा. वाघोली, पुणे) यांच्या श्री. सेठ सावरिया ट्रेडर्स, पुणे नावाच्या फर्मला २४,०३,९४६ रुपयांचा तसेच धनाजी मनु वाघारी (रा. अशोक नगर, येरवडा, पुणे) यांच्या कल्पना सारी, पुणे या फर्मला ११,९६,००० रुपये किंमतीचा एकूण ३६,००,००० रूपये किंमतीचे टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट्सचे तयार माल पुरविला.
पुणेरी व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी आणि धनाजी मनु वाघारी यांनी आदित्य पडसलगी यांच्याकडून वेळोवेळी माल घेऊन विश्वास संपादन केला होता. त्या विश्वासावर पडसलगी त्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला माल पाठविला होता. त्या मालाच्या पैशाची मागणी केली असता, ते देण्यास टाळाटाळ करुन आदित्य पडसलगी यांची ३६ लाखाची फसवणूक केलीय.
याप्रकरणी पडसलगी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार प्रकाश थाडाराम वासवानी (रा. वाघोली, पुणे) आणि धनाजी मनु वाघारी (रा. अशोक नगर, येरवडा, पुणे) या व्यापाऱ्याविरुद्ध भादवि ४०६,४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.