Type Here to Get Search Results !

सुजाण, सुसंस्कृत पिढी घडवणे हाच सर्वंकष लैंगिकता शिक्षणाचा मुख्य उद्देश : डॉ. सुहासिनी शहा


सोलापूर  :  मुले नको त्या वयात, नको त्या गोष्टी करत असतील तर ही विकृतीच आहे. बारकाईने विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की, याच्या मुळाशी लैंगिकता शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे, म्हणूनच सुजाण, सुसंस्कृत पिढी घडवायची असेल तर लैंगिकता शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.

प्रिसिजन फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा यांच्या वतीने आयोजित ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंगचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर होते.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.पी. बी. लोंढे पाटील, फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन डॉ. एन. बी. तेली, प्रिसिजन फाउंडेशनचे मॅनेजर जनसंपर्क विभाग माधव देशपांडे, डॉ. विजया महाजन, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचे जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट, युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत, एस. एस. के. प्रकल्पाचे शिवराज कुंभार, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते. 

आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोप्या करून टाकल्या, पण त्याबरोबर कधीही न अनुभवलेल्या समस्यादेखील निर्माण केल्या. मोबाईल नावाच्या वस्तूने प्रत्येक समाज घटकाचे आयुष्य व्यापून टाकले. जगाच्या दोन कोपऱ्यातील माणसांना मोबाईलने जवळ आणले, पण घरातल्याच दोन व्यक्तींच्या नात्यांमध्ये तो अडथळा बनून राहिलासंपर्क वाढला पण संवाद मात्र खुंटला,थांबला, याचे दुष्परिणाम सर्वांनाच जाणवायला लागलेत, असं डॉ. सुहासिनी शहा यांनी म्हटले.

यावेळी बोलताना, डॉ. शहा पुढे म्हणाल्या, सगळ्यांची लाडकी असणाऱी घरातील लहान मुलेसुद्धा तास न तास मोबाईलवर गुंतून राहू लागली. मुले मोबाईलमध्ये टी.व्ही.,लॅपटॉप वर काय बघत आहेत, हे पाहणे आता गरजेचे आहे. या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून, नको त्या घटना घडायला लागल्या. एका अल्पवयीन मुलाचे चिमुरडीवर शारीरिक लैंगिक शोषण..... एका वृद्धाचे लहान चिमुरडीवर अतिप्रसंग, किशोरवयीन मुली गायब होणे अशा घटना वारंवार होताना आपल्याला वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळतात, ही विकृतीच असून सुजाण, सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी सर्वंकष लैंगिकता शिक्षण ही काळाची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यशालेत ॲड. पी. बी. लोंढे पाटील यांनी प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स  या कायद्याविषयी माहिती दिली. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. श्रीकांत पाटणकर यांनी नैराश्यातून आत्महत्या व शिक्षकांची भूमिका याविषयी, छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ए. आर. टी. विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस यांनी एच.आय.व्ही. एड्स,भारत पेट्रोलियमचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील माढेकर व अरुणा गॅस एजन्सीचे कर्मचारी यांनी घरगुती गॅस गळती व्यवस्थापनाविषयी प्रात्यक्षिकातून माहिती दिली, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी यांनी किशोरवयीन जीवन कौशल्य याविषयी माहिती दिली तर जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट यांनी प्रशिक्षणार्थींची भूमिका व जबाबदारी याविषयी प्रकाश टाकला.

प्रा. डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी अध्यक्ष समारोप करताना प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती दिली. या प्रकल्पातून ३० शाळेतील मुला-मुलींसाठी तर ०४ शाळाबाह्य मुला-मुलींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत ७, ८०० पेक्षा जास्त मुलांपर्यंत कार्यक्रम घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सोलापूर महानगरपालिका अग्निशमन विभाग, सोलापूर चाइल्ड वेल्फेअर कमिटी, भारत पेट्रोलीयम-अरुणा गॅस एजन्सी, स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी अथर्व क्रीडा प्रबोधिनी व श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरी, सोलापूर कॅन्सर सोसायटी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले असे ते म्हणाले.

या कार्यशाळेत सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील ३० शाळेतील प्रत्येकी दोन शिक्षकांचा व दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था आणि सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र यांच्यावतीने जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एस. व्ही. सी. एस. हायस्कूलच्या ख्रुशी बिराजदार हिचा प्रथम तर वळसंग येथील श्री शंकरलिंग प्रशालेच्या रश्मी यांगटे हिचा द्वितीय क्रमांक आला. या दोघींना डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था यांच्याकडून आलेले ट्रॉफी व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेचे स्वागत माधव देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एन. बी. तेली यांनी केले. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर डॉ.विजया महाजन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.