Type Here to Get Search Results !

... तर थेट गुन्हे दाखल ! मनपाचा इशारा : जिवंत झाडं न तोडण्याचा सल्ला


सोलापूर : सध्या शहरात अनेक ठिकाणी डांबरी रस्ते बनविण्यात आले आहेत, त्यापैकी काही पूर्णपणे तयार झाले असून काही प्रगतिपथावर आहेत. दरम्यान, उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत, खराब होण्याची शक्यता असल्या कारणाने नागरिकांनी रस्त्यावर होळी पूजन करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. आवाहन करूनही होळी रस्त्यावर पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचाही इशारा महापालिकेने दिला आहे.

या वर्षातील होळी सण रविवारी, २४ मार्च रोजी साजरा होत आहे. हा सण धार्मिक परंपरेनुसार होलिका दहन करून साजरा करण्यात येतो. होलिका दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमवून रस्त्यावर दहन केले जाते. दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणतेही झाड न तोडता वाळलेली, वठलेल्या झाडाच्या फांद्या, गोवऱ्या यांचा होलिका दहनासाठी वापर करावा. तसेच, नुकतेच विविध योजनांमधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे करण्यात आली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. 

दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत, खराब होतो. शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचे टाळावे. शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान ५ ते ७ इंच जाडीचा मुरूम /काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावे. रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादुरुस्त झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महानगरपालिकेने कळविले आहे.