सोलापूर : येथील सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजु गायकवाड (वय ४३ वर्षे) याच्या नावावर घातक शास्त्रांचा वापर करून बेकायदा जमाव जमवणे दगडफेक खंडणी जबरी चोरी, विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर अत्याचार करणे अशी गुन्ह्यांची नोंद असून त्यास एमपीडीए अन्वये सोमवारी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलीय. दुसऱ्या प्रकरणात फौजदार चावडी पोलिसांच्या प्रस्तावानुसार अनमोल केवटे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी येथील रहिवासी अजय राजू गायकवाड याच्याविरुद्ध सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी आणि अनुसुचित जाती व अनुसूचित जमातींवर अत्याचार करणे, प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे ०६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. अजय गायकवाड यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२० मध्ये क.५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधि. १९५१ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.
त्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी, २२ मार्च रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास सोमवारी, २४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०२) अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.
..... अनमोल केवटे तडीपार
सामान्य नागरीकांना शिवीगाळ-दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणीची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अनमोल अनिल केवटे (वय-३२ वर्षे, रा.मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
अनमोल केवटे याच्याविरुद्ध २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी ही तडीपारीची कारवाई केलीय. त्या शेजारच्या राज्यातील इंडी तालुक्यातील झळकी येथे सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.