Type Here to Get Search Results !

' कानून के हाथ लंबे होते हैं ' हा हिंदी चित्रपटातील डायलॉग वास्तवात


'संचयनी' च्या खातेदार फसवणूक गुन्ह्यातील आरोपी २६ वर्षांनंतर जेरबंद.

सोलापूर : संचयनीच्या खातेदारांकडून मासिक हप्त्याची रक्कम वेळोवेळी वसुल करुन ती रक्कम खातेदारांच्या नावावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन अपहार केल्याच्या गुन्ह्यातील गेल्या २६ वर्षापासून कानून के हाथोंसे दूर राहिलेला फरार आरोपी विठ्रठल चंद्रकांत गुरव (वय- ५२ वर्षे, सध्या राहणार-थेरगांव, पिंपरी चिंचवड) याला ताब्यात घेऊन तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. 

मूळतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगांव येथील रहिवासी विठ्रठल चंद्रकांत गुरव हा संचयनी सेव्हींग्ज इन्व्हेस्टमेंटस इंडीया या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करीत होता. त्याने १९९३ ते १९९७ या कालावधीत काम करीत असताना खातेदारांकडून वेळोवेळी मासिक हप्त्याची रक्कम वसूल करून ती खातेदारांच्या नावे न भरणा करता, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला होता.

या प्रकरणी ०८ ऑक्टोबर १९९७ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील भादवि कलम 420, 408, 465, 467,468, 471 या गुन्ह्यातील फरारी आरोपी मुंबई, बेंगलोर, कोल्हापुर, पुणे वगैरे भागात गेली २६ वर्षे आस्तित्व लपवून राहत होता. सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाने अभिलेखावरील पाहिजे/ फरारी आरोपींच्या याद्या तयार केल्या असून त्यातील एक आरोपी थेरगाव बस स्टॅन्ड पिंपरी चिंचवड येथे येणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी, १८ मार्च रोजी दुपारी ०१ वाजता थेरगाव बस स्टैंड वर सापळा रचला.

गोपनिय माहितीनुसार फरार आरोपी येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता, स्वतःचे नाव विठ्ठल चंद्रकांत गुरव असे असल्याचे सांगून, त्याच्याकडे फसवणुकीच्या गुन्ह्यासंबंधी अधिक चौकशी करता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिलीय. पुढील कार्यवाही करिता त्यास सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय. या अटकेने ' कानून के हाथ लंबे होते हैं ' हा हिंदी चित्रपटातील डायलॉग वास्तवात उतरल्यासारखं दिसतंय.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,  अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाफौ महमद इसाक मुजावर, पोहेकॉ परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोकॉ विनायक घोरपडे, चापोकॉ सतीश कापरे यांनी बजावली.