सोलापूर/प्रतिनिधी : नवोदित साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार घोषणा करण्यात आली असल्याची माहिती अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार भरतकुमार मोरे जिल्हाध्यक्ष कवी नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा, येत्या ०७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र येथे प्रख्यात साहित्यिक प्रा. राजेंद्र दास (कुर्डूवाडी) यांच्या अध्यक्षतेखाली व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, साहित्यिक प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, अंकुरचे प्रदेशाध्यक्ष हिम्मत ढाले, कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे आदींच्या उपस्थितीत होत आहे.
यंदाच्या वर्षी कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्कार २०२३-२४ काव्यसंग्रह करिता डॉ. सुनील श्रीराम पवार (बुलढाणा) यांच्या 'सिजर न झालेल्या कविता' तसेच रामदास कांबळे (लातूर) यांच्या' प्रवर्तन गर्भाच्या कविता 'या दोन काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे, तर आत्मचरित्र विभागातून कोंडीराम राघोजी बोराडे (औरंगाबाद) यांच्या 'पांग' तर डॉ. देविदास तारू (नांदेड) यांच्या 'आता मव्ह काय' या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे.
दलित मित्र स्व.सौदागर मोरे स्मृती समाजभूषण गौरव पुरस्काराकरिता यंदाच्या वर्षी संभव फाऊंडेशन सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष अतिश कविता लक्ष्मण शिरसाठ तसेच असथा रोटी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार छंचुरे यांची निवड करण्यात आलीय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार याकरिता यंदाच्या वर्षी पुण्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते दलित मित्र अप्पासाहेब जाधव (गुरुजी) यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराकरिता राज्यभरातून ४५ काव्यसंग्रह १० आत्मचरित्र व समाजभूषण पुरस्काराचे १० प्रस्ताव आले होते. रोख रक्कम, गौरव चिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ०७ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे, दरम्यान दुपारी १.३० ते ३ या वेळेत गझलकार कालिदास चवडेकर ब बद्दीउजमा बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर जिल्ह्यातील कविं चे कवी संमेलन होत आहे. सहभागी कवींना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.
शहर जिल्ह्यातील कवी लेखक साहित्यिक यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष विकास कस्तुरे, कवी रामप्रभू माने, अंबादास जाधव आदी उपस्थित होते.