Type Here to Get Search Results !

'मिना बाजार' च्या अध्यक्षपदी हाजी मतीन बागवान


सोलापूर : रमजान ईदनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विजापूर वेस येथे भरविण्यात येणाऱ्या "मिना बाजार" व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी यंदाच्या वर्षी हाजी मतीन बागवान यांची तर उपाध्यक्षपदी जिलानी कुरेशी व वसीम (मुक्री) सालार यांची एकमताने निवड करण्यात आलीय.

गेल्या ७० ते ७५ वर्षापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात हा "मिना बाजार" भरविण्यात येतो. रमजान सणानिमित्ताने अनेक हिंदु-मुस्लिम बांधव या परिसरात दुकाने थाटतात. शिरखुर्माचा सुखा मेवा, कपडे, महिलांचे सौंदर्य प्रसादने, तसेच धार्मिक ग्रंथ, लहान मुलांचे कपडे, चप्पल, अत्तर फरोश, खजुर व रमजान ईदसाठी लागणारे आवश्यक सर्व वस्तुचे साहित्य विक्रीचे छोटे-मोठे ५०० ते ७०० स्टॉल या मिना बाजारात असतात. व्यापारी ग्राहक यांच्या सुसुत्रता आणण्याचे काम मिना बाजार व्यापारी संघाच्यावतीने करण्यात येतं.

मिना बाजार व्यापारी संघाचे माजी म. साहीर (इम्रान) सालार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये हाजी मतीन बागवान यांची सन २०२४-२५ सालाकरीता अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांत उपाध्यक्ष जिलानी कुरेशी, वसीम (मुक्री सालार), जनरल सेक्रेटरी अशफाक बागवान, जॉ. सेक्रेटरी मुस्ताक नजम रंगरेज, खजिनदार अ. अजीज शेख, कार्याध्यक्ष जाकीर नाईकवाडी तर हाजी मैनोद्दीन शेख, हाजी मुनाफ चौधरी, शकील मौलवी, सलीम हिरोली, इम्रान सालार, मंजूर बागवान, हाजी तौफीक हत्तुरे, कलीम तुळजापूरे, राजा सिंदगीकर, जुबेर बागवान, महमदसाब सौदागर, याकुब शेख, इसाक शेख यांच्यावर प्रमुख सल्लागार पदाची जबाबदारी सोपविण्यात आलीय.

यंदाच्या वर्षी मंगळवारी, ०२ एप्रिल रोजीपासून मीना बाजार भरविण्यास सुरुवात होणार आहे. सोलापूर महानगरपालिका, राज्य विद्युत मंडळ, पोलीस खाते यांचेही मीना बाजार व्यापारी दरवर्षी मोलाचे सहकार्य लाभते, असे नुतन अध्यक्ष हाजी मतीन बागवान व जनरल सेक्रेटरी अशफाक बागवान यांनी सांगीतले.

मीना बाजारामध्ये कोणत्याही व्यक्तीचे अथवा संस्थेचे बोर्ड लावण्यास परवानगी देऊ नये. सदर डिजीटल बोर्डामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मीना बाजार व्यापारी संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलीय.