सोलापूर : अज्ञात कारणावरून स्वतःच्या मुलांची हत्या केल्याप्रकरणी 'आई' विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. सौ. स्नेहा चिल्लाळ ( वय-३० वर्षे) आरोपीत विवाहितेचं नांव आहे. तिने तिच्या मुला-मुलीस साडीच्या सहाय्याने गळफास देऊन हत्या केल्यावर स्वतः गळफासाने आत्महत्या केलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुळेगाव रस्त्यावरील उर्दू शाळेनजिकच्या सरवदे नगरातील प्लॉट क्रमांक ०५ मधील रहिवासी सौ. स्नेहा संतोष चिल्हाळ हिने रविवारी, ०३ मार्च रोजी सकाळी ११ ते १२ वा. च्या सुमारास राहत्या घरी मुलगा मनोजकुमार चिल्लाळ (वय-०७ वर्षे) आणि ११ वर्षीय मुलगी कु. संध्या या लेकरांना साडीच्या सहाय्याने गळफास देऊन जीवे ठार मारले. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यावर संतोष दत्तात्रय चिल्लाळ यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. दोन लेकरांच्या हत्या आणि सौ. स्नेहा च्या आत्महत्येमागील कारण पुढं आलेले नाही.
याप्रकरणी संतोष चिल्लाळ यांनी रविवारी रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मृत सौ. स्नेहा संतोष जिल्हा हिच्याविरुद्ध दोन मुलांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.