सोलापूर : विष्णुनगरात घटनेस काही तरुणांनी वेगळे जातीय धार्मिक गुन्ह्याचे वळण देऊन त्याबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करुन दोन समाजामध्ये जातीय/धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारे विजय क्षिरसागर याच्यासह तिघांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यात आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या स्टुडिओ चालकाचा समावेश असल्याची शहर पोलीस माहिती कक्षातून देण्यात आलीय.
हा गुन्हा दाखल होण्यामागील पार्श्वभूमी अशी की, रविवारी, १७ मार्च रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास विष्णूनगर, पोशम्मा मंदीरासमोरील दशरथ रामदास साई यांच्या किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स उधार न दिल्याच्या वैयक्तिक कारणातून ८ ते १० जणांच्या जमावाने मिळून दुकानदार दशरथ साई यांना लोखंडी रॉड, लाकडी बांबू व दगडाने मारहाण केली.
त्यानुषंगाने फिर्यादी दशरथ साई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन १० आरोपींविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. या गुन्ह्यात निष्पन्न १० पैकी ४ आरोपींना अटक करण्यात आलीय. उर्वरित ६ आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे.
या घटनेच्या अनुषंगाने जातीय धार्मिक गुन्ह्याचे वेगळे वळण देऊन त्याबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करुन दोन समाजामध्ये जातीय/धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारे विजय क्षिरसागर, श्रीनिवास सारंगी आणि आक्षेपार्ह तो व्हिडीओ तयार व मिक्सिंग करणाऱ्या स्टुडीओ चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम ५०५ (२), ३४ प्रमाणे बुधवारी, २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे,
.....आवाहन .......
... आक्षेपार्ह वक्तव्य करु नयेत !
समाजा-समाजामध्ये धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह मजकूर, चित्र अथवा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करु नये. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखाविल्या जातील, असे कोणत्याही व्यक्तीविषयी, जाती-धर्माविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी अथवा देवी-देवतांविषयी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करु नयेत, असं आवाहन शहर पोलिसांनी केलं आहे.