सोलापूर : परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार शुभम सिध्दाराम गायकवाड (वय- २९ वर्षे) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आलंय. त्यास पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर , उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.
परिसरातील लोकांच्या जिवीतास हानी पोहचविणे, अवैधरित्या मटका चालविणे, महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ०६ गुन्हे शुभम सिध्दाराम गायकवाड (रा. सुंदरम नगर, विजापूर रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ, सोलापूर यांचे आदेश पारित झाले होते. त्यास १८ मार्च २०२४ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर तळेगांव दाभाडे, चाकण रोड, पुणे येथे सोडण्यात आलं आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग ०२) अजय परमार, वपोनि विजापुर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड, दुपोनि संगीता पाटील, सपोनि शितलकुमार गायकवाड, पोशि/१४८९ रमेश कोर्सेगांव यांनी पार पाडली.