सोलापूर : वाटणीच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावरती घेण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा झालेले तलाठी गुरसाळेचे तत्कालीन तलाठी सत्यवान डुबळ व एका खाजगी इसमाची मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी राजेंद्र वाघमारे यांनी त्यांच्या कुटुंबाची एकत्रित मिळकतीची वाटणी प्रमाणे झालेल्या नोंदी सातबारा उताऱ्यावरती घेण्यासाठी गुरसाळीचे तत्कालीन तलाठी सत्यवान डुबळ यांच्याकडे अर्ज केलेला होता.
वाटणीप्रमाणे वाटणीच्या नोंदी सातबारा उताऱ्यावरती घेण्यासाठी तलाठी सत्यवान दुबळ यांनी लाचेची मागणी केली. राजेंद्र पाटील यांनी ती लाचेची रक्कम स्वीकारली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. या प्रकरणी तलाठी सत्यवान डुबळ व राजेंद्र पाटील यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.
या शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले होते. सदर अपिलाची सुनावणी वेळी आरोपींच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये, आरोपींनी लाचेची मागणी केली व ती स्वीकारली, असे सरकारपक्षातर्फे सिद्ध करण्यात आलेले नाही, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी आरोपींतर्फे ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. आर. आघरकर यांनी काम पाहिले.