Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीत घटक पक्ष रा. स. प. ला लोकसभेची एक जागा


मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी रविवारी, २४ मार्च रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर  महादेव जानकर यांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून एक जागा देण्यात आलीय.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी, महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते. या चर्चेनंतर झालेल्या निर्णयासंबंधी माध्यमांना दिलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रा. स. प. नेते महादेव जानकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असा विश्वासही जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.