Type Here to Get Search Results !

रमजानुल मुबारक - ७ मानवी प्रशिक्षणाचा काळ

 

मजान महिना ही जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्वणी आहे. व्यक्तीच्या प्रशिक्षणाचा हा काळ आहे. दैनंदिन जीवनामध्ये वावरतांना अनेक प्रसंग आपल्या समोर येतात. त्यांना सामोरे जाताना आपण कशा पद्धतीने वागले पाहिजे, याचे प्रशिक्षण रोजाच्या माध्यमातून रमजान महिन्यात होत असते. यासाठी केवळ उपाशी राहून चालत नाही. तर प्रत्यक्ष कृतीची गरज असते आणि महिनाभर झालेली ही कृती पुढे वर्षभर जर आपल्या जीवनात टिकली तर आपण जिंकलो.

रोजा असो अगर नसो, प्रत्येक माणसाने बोलताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अश्लील बोलणे, शिव्या शाप देणे, खोटं बोलणे या कृतीमुळे व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. रोजामुळे आपण कसे वागावे, याची एक सीमारेषा आखली जाते. विनाकारण कुणाशी वाद घालू नये, कुणाची निंदा करू नये, शिव्याशाप देऊ नये, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावेल, असं कोणतंही वक्तव्य आपण करू नये, ही सर्व शिकवण रोजातून मिळत असते.

दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीने कसे वागावे, याची एक आचारसंहिता इस्लाम धर्माने कुरआनच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. प्रत्येकाने त्या पद्धतीनेच वागले पाहिजे. व्यवहारांमध्ये सचोटी असावी. वागण्यामध्ये नम्रता असावी. कुणाची ही पाठीमागे निंदा करू नये, याला गिबत म्हणतात. हा सर्वात मोठा रोग प्रत्येकाला लागलेला आहे. एखाद्याचं चुकलं असेल तर समोरासमोर त्याला सांगणे कधी ही चांगलं. परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ त्याच्याबद्दल निंदात्मक बोलणे, हे मान्य नाही. कोणी जर आपल्याशी विनाकारण भांडत असेल तर त्याला तोंड न देता भाऊ मला रोजा आहे, असे सांगून शांत राहावे. आपला रोजचा वेळ ईश्वर भक्तीसाठी समर्पित करावा. ईश्वराचे म्हणजे अल्लाहचे नामस्मरण करावे. कुरआन पठण करावे. दानधर्म करावा. आपल्या घरामध्ये चांगले खात असताना आपला शेजारी भुकेला आहे किंवा कसे याची दक्षता घेण्याची शिकवण सुद्धा हजरत पैगंबरांनी दिली आहे.

रमजान महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारांचे मोठे पुण्य आहे. हा पुण्यसंचय करण्यासाठी प्रत्येकाने अल्लाहतआला ने निश्चित केलेल्या मार्गानुसार व हजरत पैगंबरांनी दिलेल्या संदेशानुसार आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर जीवनातून सर्व प्रकारच्या चुकीच्या चालीरीती, वाईट प्रथा नष्ट होऊन एक परमार्थ जीवन जगता येईल. आपल्यामुळे इतरांना दुःख होईल किंवा यातना होतील, असं वर्तन कुणीही करू नये. याचे प्रत्यक्ष आचरण रमजान महिन्याच्या माध्यमातून केले जाते. ते अंगिकारून प्रत्येकाने आपले जीवन सफल करण्याचा प्रयत्न केल्यास यथार्थ जीवन जगल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकते. यासाठी मनाचा निश्चय करून आपण आपले दैनंदिन वर्तन केले पाहिजे. (क्रमशः)

सलीमखान पठाण

९२२६४०८०८२