सोलापूर : महामार्ग विकासात अक्कलकोट रस्त्यावरील कोंडा नगर येथील ठिकाणी जवळपास ६५ घरे पाडण्यात आली. त्यास तीन वर्षे झाली, ही बाधित कुटुंबं त्यांचा प्रपंच उघड्यावर मांडून आहेत. या बेघरांना राहण्याची सोय अद्याप झालेली नाही. त्या ६५ कुटुंबांचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर गुरुवारपासून विश्वभूषण कांबळे यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. शुक्रवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महापालिकेशी संगणमत करून कोंडा नगर येथे ६० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या जवळपास ६५ कुटुंबाना रस्ता रुंदीकरणासाठी काही क्षणात बेघर करून रस्त्यावर आणले. त्यांचे प्रपंच आजही उघड्यावर आहेत. त्यांच्या राहण्याची सोय अथवा पर्यायी जागा असा कोणताही मार्ग न काढल्याने ब्रिजखाली गंगा नाईकवाडी या महिलेनं अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात लहान ०२ मुली व ०१ मुलगा आज पोरकेपणाचे आयुष्य जगत आहेत. गेल्या ०३ वर्षात अल्पवयीन मुले, वयोवृद्ध असे जवळपास १८ ते २० जणांचा जीव गेला, हाताला काम नाही आणि राहायला घर नाही, भीक मागून खाण्याची अवस्था या बेघरांची झालीय.
या उपोषणाला प्रहार जनशक्ती शेतकरी संघटना तालुका ध्यक्ष राजकुमार स्वामी (मंगळवेढा), अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,भीमताल सामाजिक संगठन संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि उत्तम भाऊराव शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे.