सोलापूर : स्वातंत्र्यापूर्वी या देशात कोणीच भारतीय नव्हता देश प्रांता, प्रांतात विभागलेला होता. राज्यघटना अस्तित्वात आली, त्या दिवसापासून आपण भारतीय झालो आहोत. ज्या दिवशी तुम्ही 'आम्ही भारतीय लोक' म्हणून घरातून बाहेर पडाल, त्या दिवसापासून या देशात एकही धार्मिक दंगल होणार नाही, इतकी ताकद संविधानाच्या उद्देशिकेतील आम्ही भारतीय लोक या शब्दात आहे असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, सोलापूर युनिटने शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉ. किर्लोस्कर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, ज्येष्ठ पत्रकार तथा क्रियाशील विचारवंत उत्तम कांबळे यांनी येथील श्रोत्यांशी संवाद साधला. संवादाचा विषय होता, 'आम्ही भारतीय लोक'... भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील प्रारंभाच्या तीन शब्दावर ते बोलत होते.
१९४७ पूर्वी ह्या माणसांचं विभाजन भारताऐवजी प्रदेशात झालं होतं, एखाद्याला त्याची ओळख विचारली तर कोणी सौराष्ट्रचा, कोणी काश्मीरी होता. त्याचा प्रांत त्याची ओळख होती, कारण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशाच्या भूगोलाचे ६४० तुकडे होते आणि इथल्या माणसाला ६४० भूगोलाचे नाव होते, देशाचे नाव भारत नव्हते, असंही त्यांनी प्रारंभी सांगितले.
यावेळी बोलताना कांबळे पुढं म्हणाले, ज्या लोकांनी १८०० मध्ये एका गाभिल क्षणी राष्ट्राचे स्वप्न पाहिले, आणि १९४७ पर्यंत १४७ वर्षे स्वप्नाचा पाठपुरावा करत राहिले. त्या लोकांची स्वप्नपूर्ती स्वातंत्र्य आहे. या देशाची राज्यघटना सहजासहजी बनलेली नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कमिठ्या काम करीत होत्या. कमिठ्याकडं आलेल्या कच्च्या चिठ्यावर चर्चा व्हायची, त्यातून ही राज्यघटना आस्तित्वात आलीय. तसं पाहता, हे सर्व होत असताना, गांधीवादी अग्रवाल टंकलिखित राज्यघटना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडं आला होता.
डॉ. बाबासाहेबांनी अग्रवाल यांच्याकडं या घटनेचा आत्मा काय आहे असं विचारलं होतं त्यावर खेड्यांची उन्नती असं सांगून खेड्यांचा विकास असं त्यांनी सांगितलं होतं, ज्यामध्ये १८ विश्वास दारिद्र्य, भेदाभेद असायचा. याचा अर्थ ती रेडिमेड राज्यघटना खेड्यांना अर्पित केलेली होती. जगाच्या पाठीवरील अनेक राष्ट्रांच्या राज्य घटना देवांना, देवांच्या दुतांना, प्रेषितांना आणि राजांना अर्पित केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील लोकांना अर्पित केलेली आहे. म्हणून संविधानाच्या उद्देशिकेचा पार प्रारंभ आम्ही भारताचे लोक लोक असा आहे, अन् ती उद्देशिका लोकांना अर्पित केलेली आहे.
गेल्या काही वर्षापासून दणकट बनलेल्या वा बनू पाहणाऱ्या वेगळ्या वेगळ्या धर्माच्या सावल्या पसरत आहेत. जातीच्या सावल्या पडायला लागल्या,पंथाच्या सावल्या पडायला लागल्या, वर्गाच्या सावल्या पडायला लागल्या, भाषेच्या सावल्या पडायला लागल्या सीमा प्रश्नाच्या सावल्या पडायला लागल्या आणि हे 'आम्ही भारतीय लोक ' अडचणीत आल्यासारखी परिस्थिती तयार झाली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय एकच मार्ग आहे म्हणजे ' आम्ही भारतीय लोक ' म्हणा धार्मिक लोक मागे पडतील, स्त्री-पुरुष विषमता निर्माण करणारे पलायन करतील. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला एक महान पेटंट वापरत आहात, 'आम्ही भारतीय लोक' ! धर्म आपल्या घरात संविधान आमल्या मनात आहे, ते पुन्हा एकदा धर्मावर आधारलेला राष्ट्रात रूपांतर करू पाहत आहेत, आपल्या मनामनात वसलेली लोकशाही आणि आम्ही भारतीय लोक भारताचं राष्ट्र होऊ देणार नाही, असेही कांबळे यांनी शेवटी सांगितले.