Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री मोदींचे फोटो लावून भारत चावल ब्रँड तांदूळ विकणाऱ्या माफियांचा करा बंदोबस्त : विष्णू कारमपुरी


महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : शहरात गेल्या काही दिवसापासून लोकवस्ती झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्राॅंड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या २९ रुपये किलो तांदूळ विकले जात आहे, या तांदूळ माफीयांनी ग्राहकांकडून आधार कार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्र मागत आहेत, म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकाकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफीयांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सोलापुरात भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदी यांचं छायाचित्र लावून आम रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राजरोसपणे २९ रुपये किलो दराने १० किलोचे पॅक विकलं जात आहे. या  तांदळाला बासमती चावल अशा प्रकारचे नाव देऊन ग्राहकांचे फसवणूक व तांदूळ काळाबाजार करीत आहेत, त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड व रेशन कार्ड याच्या झेरॉक्स मागत आहेत, त्यावरून ग्राहकांची डाटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, असं या निवेदनात उल्लेख करण्यात आलाय.

अशाच प्रकारे गेल्या ०२ महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ५० रुपये किलो या भावाने दाळ विकली गेली, हा देखील तोच प्रकार होता, परंतु कोणाच्या लक्षात आलं नाही, एकूणच पुढे निवडणुकीच्या काळ आहे, निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठविल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कारमपुरी यांनी म्हटले आहे.



आगामी लोकसभेची निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावी, असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्यास बाधा आणण्याचा छुपा प्रयत्न या कृतीद्वारे होत आहे. कर्णिक नगर भागात ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख धनराज जानकर यांनी व नागरिकांना त्यांना अडविले, ती तांदळाची गाडी जेलरोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली, त्या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी विष्णु कारमपुरी (महानगर प्रमुख), धनराज जानकर शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत काय प्रकार चालू आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली. यास जेलरोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक व नागरिक निघून गेले, असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात रेखा आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी, रेवन बुक्कानुरे, विठ्ठल कुराडकर, धनराज जानकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल आदी शिवसैनिक उपस्थित होते.