Type Here to Get Search Results !

मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कुरबुरीतून बांबूच्या दांडक्याने पिता-पुत्रासह तिघांना जबर मारहाण

 

सोलापूर : शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यावर मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कुरबुरीतून ९ जणांसह इतरांनी पिता-पुत्रासह तिघांना जबर मारहाण केलीय. ही घटना सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बुधले गल्लीतील देवदत्त अपार्टमेंट समोर घडली. याप्रकरणी अनिकेत वडतिले याच्यासह ९ जणांसह इतरांविरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहिती कक्षातून सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काशीकापडे गल्ली, पश्चिम मंगळवार पेठेतील रहिवासी यश संतोष भिंगारे (वय - २१ वर्ष) त्याचे मित्र दर्शन अवसारे, प्रेम झेंडगे, सनी वाघमारे शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. ते नवीवेस पोलीस चौकी येथील चौकात नाचत असतांना, त्यांच्या घराजवळ राहणारे अनिकेत वडतिले याला यशचा धक्का लागला. त्यावेळी तिघांनी मिळून आम्हाला धक्का मारतो का, असे म्हणून मारहाणीस सुरूवात केली. तेथील लोकांनी सोडवा-सोडव केली.

त्यानंतर ते सर्वजण मिरवणूक पाहण्यास निघून गेले. ते रात्री त्यांचा मित्र प्रेम झेंडगे याच्या घरी आले असता ०९ जणांसह आलेल्या इतरांनी त्यांना खाली बोलावून बांबूच्या लाकडी दांडग्याने मारहाण केली.  प्रेमचे वडील रामचंद्र झेंडगे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बांबूने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार अनिकेत वडतिले, योगेश वडतिले, रोहित वडतिले, अजय वडतिले, किरण वडतिले, मनोज साळुंखे, राहुल वडतिले, रितेश वडतिले व इतर पाच ते सहा जणांविरुध्द मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार भोगशेट्टी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.