Type Here to Get Search Results !

घरफोडी व मोटार सायकल चोरीचे ०३ गुन्ह्यांचा उकल; गुन्हे शाखेची उल्लेखनिय कामगिरी



सोलापूर : शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्ह्यांचा तपास करीत असताना शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाला घरफोडीचा एक व मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेला मोटार सायकल चोरीचे ०३ व घरफोडी चोरीचा ०१ असे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आणून, १,३५,२०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकातील पोलीस शिपाई सुभाष मुंडे आणि भारत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक तरुण चोरीची मोटरसायकल विक्रीकरिता थांबला असल्याचे कळले होते. ०५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने साकीब सलीम शेख (वय २० वर्षे, व्यवसाय हमाली, रा. न्यु पाच्छा पेठ, खड्डा तालीम, सोलापूर) याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कौशल्यपूर्ण तपासात MH 13 BW 9891 क्रमांकाची मोटरसायकल 23 जानेवारी रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोरुन चोरी केली असल्याचे कबुली दिली.

या आरोपीकडे कसून चौकशी करता, त्याने २७ डिसेंबर रोजी मार्कंडेय बगीच्या येथून एच एफ डीलक्स मोटरसायकलची चोरी करून ती मोटार सायकल, अमन याकूब हिरापूरे (वय २९ वर्षे, व्यवसाय-मोटार गॅरेज, रा. ७५२/२ ब, गोदुताई विडी घरकुल, सोलापूर) यास विक्री केली असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे २९ जानेवारी रोजी संमती कट्टा, सिध्देश्वर मंदिर येथून एक सी.डी. डिलक्स मोटार सायकल चोरी करुन, ती मोटार सायकल ती, फारुख ईस्माईल मकानदार (वय ३५ वर्षे, रा. मारुती मंदीराजवळ, इटकळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यास विक्री केल्याचे सांगितले.

त्यानुसार, वरील ०३ आरोपींना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून सोलापूर शहरातून जेलरोड व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या ७५ हजार रूपये किंमतीच्या ०३ मोटार सायकली जप्त करण्यात येऊन, मोटार सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आले. उर्वरित वाहनाचे क्रमांक एच.एफ. डिलक्स मो.सा.क्र. MH 13 CV 7189 सी.डी. डिलक्स मो.सा. क्र. MH 13 AE 0252 असे आहेत.

त्याचबरोबर ०५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकातील पोलीस नाईक बापू साठे यांना, सिद्दाराम परमेश्वर जिरगे (वय ३७ वर्षे, व्यवसाय-हमाली, रा. घर नं.४०, महादेव मंदीराजवळ, मेहताब नगर, शेळगी) याने मार्केट यार्ड, सोलापूर येथे दिवसा घरफोडी केली असून तो सध्या महालक्ष्मी मंदीर ते मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्या नुसार पोउपनि अल्फाज शेख व तपास पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन,  कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने दि. ०४ फेब्रुवारी रोजी रोजी मार्केट यार्ड येथील दुकान दुपारच्या वेळी फोडून चोरी केल्याची कबुली दिली. 

त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या १,८०,००० रुपये रोख रक्कमेपैकी ६०,२०० रुपये रोख रक्कम जप्त केली. सदर दिवसा घरफोडीबाबत जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हा नोंद असून, हा दिवसा घरफोडीचा ०१ गुन्हा उघडकीस आला. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सतिश काटे, अविनाश पाटील यांनी केली.