सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी मुळेगाव तांडा येथील सालकी वेअर हॉऊसच्या पूर्व बाजुस असलेल्या चिलारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाच्या दारूच्या हातभट्टयावर छापे टाकून कारवाई केली. त्यात ०२.०८ लाख रूपये किंमतीचे ६४०० हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी ०३ इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले.
यापूर्वी सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा गुन्हेगारी 'रेकॉर्ड' पडताळून त्यांच्याविरूध्द हद्दपारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सांगितले.
सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (सोलापूर उपविभाग) संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली.