Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त...... जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शिवगर्जना महानाट्य पाहण्यास उत्स्फूर्तपणे यावे : जिल्हाधिकारी आशीर्वाद

 सोलापूर :  राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्य सादर करण्याबाबत सुचित केलेले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हरिभाई देवकर प्रशालाच्या प्रांगणात दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पाहण्यासाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, अभिजीत पाटील महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्निल यादव यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, शिवगर्जना महानाट्य चा जिल्ह्यातील तीन दिवसाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून संबंधित संस्थेला सहकार्य करावे. तसेच हे महानाट्य पाहण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिक येतील यासाठी प्रचार व प्रसिद्धी करावी. दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी 2024 यादरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये. प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखाच्या ड्युटी चार्ट तयार करून महानाट्याच्या ठिकाणी संबंधित विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याबाबत सूचित करावे. महानाट्यदरम्यान पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शिवगर्जना महानाट्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची रचना सांगितली यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून पोलीस शहर आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, सांस्कृतिक व पर्यटन विभागाचे अधिकारी सदस्य असतील अशी माहिती दिली.

तसेच हे शिवगर्जना महानाट्य हरिभाई देवकर प्रशालाच्या प्रांगणात तीन दिवस सादर केले जाणार असून सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे यामध्ये जवळपास अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली.