(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षिस योजना दरवर्षी राबविण्यात येते. सदर कापड स्पर्धेकरीता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपारीक व अपारंपारीक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविण्यपुर्ण व / कलात्मक वाणाची प्रदर्शीत वाणामधून निवड करुन उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षिस देवून हातमाग विणकरांला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पारंपारीक व अपारंपारीक वाणाचे कापड उत्पादन करणाऱ्या विणकराकरीता सन २०१६-१७ पासून विभागीय स्तरावर विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने वरील हातमाग कापड स्पर्धेची पुनर्रचना करुन महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक हातमाग -२०१५/प्र.क्र.१४/टेक्स-३, १७ ऑक्टोंबर २०१६ च्या निर्णयान्वये हि स्पर्धा विभागीय हातमाग कापड स्पर्धा असे नामकरण करुन विभागीय स्तरावर आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे. प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांचे अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था/स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरासाठी हातमाग कापड स्पर्धा मा. आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर यांचे दिशानिर्देशानुसार विभागीय स्तरावर प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर त्यांच्यावतीने दिनांक.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक रविवार पेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धा करीता पारंपारीक (साड्या, लुगडी, लुंगी, खणावळी, धोतरे इत्यादी) व अपारंपारीक (टॉवेल, चादरी, शर्टीग, कोटींग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हॅगींग इत्यादी) वाणाचे हातमाग विणकरांनी त्यांनी हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नाविण्यपुर्ण हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी विणकराकडून प्राप्त झालेल्या वाणाचे बुधवारी, १३ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रदर्शीत करण्यात येऊन त्यामधून विभागीय हातमाग कापड निवड समिती मार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा कार्यक्रमास हातमाग व्यवसायाशी संबंधीत हातमाग विणकरांना उपस्थित राहता येईल. तसेच स्पर्धेसाठी उत्पादनाचे वाण सादर केलेल्या विणकरांना या कार्यक्रमास न चुकता हजर राहणे आवश्यक आहे. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग घेवून प्रदर्शीत केलेल्या वाणामधून प्रथम पारितोषीक २५ हजार रुपये, द्वितीय २० हजार रुपये व तृतिय बक्षिस १५ हजार रुपये प्रमाणे पारितोषीक जाहिर करुन हातमाग विणकरांना समारंभाच्या वेळी प्रशस्तिपत्रकासह देण्यात येणार आहे.
तरी सदर विभागीय हातमाग स्पर्धेकरीता हातमाग सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर चंद्रकांत टिकुळे, यांनी आवाहन केले आहे.