सोलापूर : महुद ते सांगोला व वेळापूर ते महुद या राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. सदर महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत, २७ फेब्रुवारी पासून सांगोला तालुक्यातील महुद गावातून जाणाऱ्या जड वाहनांसाठी वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबातचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत.
सांगोला ते महुद या महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच वेळापूर ते महुद महामार्गाचे काम मंजुर आहे. इंदापूर, वेळापूरवरून कोल्हापूर, सांगली, सांगोला व जतकडे जाणारी तसेच कोल्हापूर, सांगली, सांगोला व जत कडून पुणे, सातारा, इंदापूर कडे महुद या गावातून जाणारी जड वाहतुक व मोठे ट्रेलर तत्सम वाहनांची वाहतुक (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, उस वाहतुक करणारी, स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना वगळून) बंद करण्यात येत आहे.
महुद गावामध्ये झेड प्रकारचे वळण आहे. त्यामुळे अवजड वाहने व ट्रेलर तत्सम वाहने हे गावातून जाताना वळणावर वळताना अडचणी निर्माण करतात. परिणामी स्थानिक बाजारपेठ व जनतेला रहदारीस अडचण निर्माण होत असल्याने सदर महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत महुद गावातून जाणारी अवजड वाहतुक व ट्रेलर तत्सम वाहने बंद करून ती अन्य उपलब्ध पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत.
पर्यायी मार्ग :
इंदापूर, पुणे, फलटण, वेळापूर कडून सांगोला कडे जाणारी जड वाहतुक साळमुख चौक येथून पंढरपूर, सांगोला या पर्यायी मार्गाने जातील तर सांगोला, कोल्हापूर, जत कडून वेळापूर, इंदापूर कडे जाणारी जड वाहतुक सांगोला, पंढरपूर मार्गे जातील.