सोलापूर : एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून योगा अनोळखी इसमानी संबंधित खातेदाराच्या अकाउंटमधून ७६ हजार रुपयाहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपूर्वी घडली. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघां आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दत्तनगर दत्त मंदिर शेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी (वय - ४९ वर्ष) त्यांचं एटीएम कार्ड घेऊन होटगी रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या आय सी आय सी आय एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्या आधारे व्यवहार करीत असताना, त्यांचं व त्याचा भाऊ महेश देवसानी यांचे आयसीआयसीआय एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. दोघा अनोळखी इसमांनी त्या कार्डचा गैरवापर करून त्यांच्या व त्यांचा भाऊ यांच्या खात्यावरील ७६, ४०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यावर कुमार देवसानी यांनी शुक्रवारी सायंकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.