निवडणूक प्रशासनाने होम वोटिंगची प्रक्रिया सूक्ष्मपणे नियोजन करून यशस्वी करावी.
ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झालेले आहे, त्या केंद्रास आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करावे.
सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व ही निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी पोलीस अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गांभीर्यपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्ट्रॉंग रूमसह ईव्हीएम मशीनबाबत अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. इतर जिल्ह्यातून दारू, पैसा व अन्य संबंधित बाबी आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तयार करावेत. तसेच आंतर राज्य सीमेवर ही चेक पोस्ट तयार करून तिथे निवडणूक पथके नियुक्त करावेत, असेही त्यांनी सूचित केले.
भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंग हा पर्याय ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार तसेच दिव्यांग मतदारासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जवळपास ०१.२५ लाख ८० वर्षे वय असलेले व दिव्यांग मतदार आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तात्काळ डी-१२ चा फॉर्म या मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून घरातून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार याची माहिती भरून घ्यावी. घरून मतदान करण्यासाठीची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असलेला पोलिंग स्टाफ यांची नियुक्ती करावी व त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशही मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात लोकसभेचे ४२ - सोलापूर (अनुसूचित जातीसाठी राखीव) व ४३ -माढा असे दोन मतदार संघ आहेत. जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून ०३ हजार ५९९ मतदान केंद्र आहेत. यातील नागरी भागात ०१ हजार २४३ तर ग्रामीण ०२ हजार ३५६ मतदान केंद्र आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार ४३ लाख १७ हजार ७५६ तर २०२४ मध्ये अंदाजे लोकसंख्या ४७ लाख २६ हजार १४३ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्याची सीमा राज्यातील सात जिल्ह्याला लागून असून, अंतर राज्य सीमा कर्नाटक राज्यातील कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्याला लागून आहे. तर मागील लोकसभा निवडणुकीत ६१.२८ टक्के मतदान झालेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
त्याप्रमाणेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्धता, नवीन मतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न, मतदार यादीतील मतदारांची नावे वगळणे याबाबत केलेली कार्यवाही, स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम मशीन, आदर्श मतदान केंद्र, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे अनुषंगाने सविस्तर माहिती त्यांनी दिली.
यावेळी नागरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर व एकूण निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार व पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विविध समित्यांची यावेळी माहिती दिली.
........ चौकट ......
जिल्ह्याची २७ फेब्रुवारीअखेर मतदार संख्या ३६, ०७, ५३१
सोलापूर जिल्ह्याची २७ फेब्रुवारीअखेर मतदार संख्या ३६ लाख ७ हजार ५३१ इतकी असून, त्यातील पुरुष मतदार १८ लाख ६७ हजार १३८ तर महिला मतदार १७ लाख ४० हजार १०९ इतके आहेत. तृतीयपंथी मतदार संख्या २८४, परदेशात गेलेले मतदार ५४, दिव्यांग मतदार २७ हजार ०४ व ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार १ लाख ०६ हजार १३९ तर १०० वय वर्ष पेक्षा अधिकचे मतदार ३ हजार २३, सर्विस मतदार ४ हजार ६१६ इतके आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
....... चौकट .....
मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक
त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात : श्रीकांत देशपांडे
लोकशाहीच्या या उत्सावात जास्तीत-जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी स्वीप ची प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवावी व जास्तीत जास्त प्रमाणात मतदाराची नोंदणी करून मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे, यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम्प, त्याचबरोबर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र शौचालयाच्या सुविधा आहेत की नाहीत, याची पुन्हा एकदा व्यवस्थित खात्री करून घ्यावी, असे निर्देश देशपांडे यांनी दिले.