या मालिकेत मच्छिन्द्रनाथांची भूमिका साकारत असलेले अभिनेता जयेश शेवलकर तर गोरक्षनाथांच्या आणि महादेवांच्या भूमिकेतील नकुल घाणेकर रविवारी अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी आले होते. स्वामी दर्शनानंतर सोलापुरात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
छोट्या पडद्यावर विविध मालिका येत आहेत, ' गाथा नवनाथांची ' ही मालिका, सोनी मराठी वाहिनीवर २१ जून २०२१ रोजी सुरू झाली. अध्यात्मिकतेचा धागा धरून तयार करण्यात आलेल्या मालिकेला मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, ही मालिका अमराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे या मालिकेसंबंधी आलेल्या प्रतिक्रियावरून दिसते, असं प्रारंभी जयेश शेवलकर व नकुल घाणेकर यांनी म्हटले.
हल्ली साचाबध्द मांडणीच्या अनेक मालिका विविध वाहिन्यांवर सुरू आहेत. त्यात ' गाथा नवनाथाची' ही अध्यात्मिक मालिकेचे जवळपास ९०० भाग पूर्ण झाले आहेत, ही प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीची पावतीच आहे. मालिकेच्या प्रारंभापासूनच प्रेक्षकांनी कलाकारांना जणू डोक्यावर उचलून धरलं आहे. आतापर्यंत 'गाथा नवनाथांची' या मालिकेत गुरू आई-पाटील यांचे कारस्थान, नागिनीचा दंश झाल्यानंतर नागनाथांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून आईचे वाचवलेले प्राण आणि नागनाथांच्या हस्ते होत असलेला गुरू आईचा संहार हे पाहिलं आहे, पुढील भागात काय पाहायला मिळणार ? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे,
नवनाथांच्या जोडीला आदिशक्ती महालक्ष्मीचे हे तेजोमय व विलोभनीय रूप नक्कीच प्रेक्षक भक्तांसाठी पर्वणी ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका 'गाथा नवनाथांची' सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर... असं आवाहन उभयतांनी केलं आहे.
....... चौकट .....
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव
सोहळा देखील अनुभवता येईल
सध्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्याकडे नागनाथांचे नाथ सांप्रदयातील शिक्षण सुरू आहे. या दरम्यान नागनाथांना श्री गुरूदेव दत्त आणि इतर नाथांकडून शिक्षण देताना भीक्षेचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जेव्हा किरणोत्सव सोहळा पार पडला, त्या काळात श्री गुरूदेव दत्त हे कोल्हापुरात नागनाथांना भीक्षेचे महत्व समजावून सांगताना भीक्षा मागत असल्याचा एक पौराणिक संदर्भ आहे. त्यानुसार मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक, भक्तांना श्री गुरूदेव दत्त आणि नवनाथांची कथा उलगडताना कोल्हापुराच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा देखील अनुभवता येणार असल्याचे जयेश शेवलकर व नकुल घाणेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
...... चौकट....
या भूमिकेतून सकारात्मक दृष्टिकोन
शिकायला मिळाला : जयेश शेवलकर
या मालिकेत मच्छिंद्रनाथाची भूमिका साकारण्यापूर्वी नाथ परंपरेविषयी थोडीफार माहिती होती, ही आव्हानात्मक भूमिका साकारत असताना नाथ परंपरेची अधिक माहिती मिळाली. आज मच्छिंद्रनाथाची भूमिका साकारत असताना जनमानसात गेल्यावर प्रेक्षक त्या भूमिकेला स्मरून चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो प्रयत्न मच्छिंद्रनाथासाठी असतो, असं मी मानतो. या मराठी मालिकेला परराज्यातून पसंती मिळाली, आजपर्यंत सर्व निर्विघ्नपणे पार पडलंय. सामान्य आयुष्य जगत असताना यशानं हुरळून जायचं नाही, अन् मनाविरुद्ध घडलं तर हताश व्हायचं नाही, हा सकारात्मक दृष्टिकोन या भूमिकेतून शिकायला मिळाला असेही जयेश शेवलकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
............