Type Here to Get Search Results !

श्रीमती अलका लांबा यांना देण्यात यावी राज्यसभेची उमेदवारी : विजयकुमार हत्तुरे

सोलापूर : अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती अलका लांबा यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ  नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव के.सी.वेणूगोपाल यांच्याकडे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नुकत्याच रुजू झालेल्या श्रीमती अलका लांबा यांनी काँग्रेस पक्षासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. यापूर्वी एनएसआयच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अलका लांबा यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष पदभार सांभाळला आहे.

प्रख्यात राजकीय तज्ञ आणि सुस्पष्ट वक्तृत्वाच्या धनी असलेल्या श्रीमती लांबा यांनी काँग्रेस पक्षासाठी प्रवक्त्या म्हणून काम पाहिले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून बोलत असतांना त्यांनी कित्येकवेळा विरोधकांची बोलती बंद केली आहे. त्यामुळे पक्षाच्या एक प्रबळ नेत्या म्हणून त्या संपूर्ण देशात सुपरिचित आहेत. 

एक कणखर व्यक्तिमत्त्व आणि तळागाळातील लोकांच्या समस्यांचा सखोल अभ्यास असल्यामूळे त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्यास राज्यासाठी ही सन्मानाची बाब ठरेल. आणि वरिष्ठ स्तरावरील त्यांच्या राजकीय अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. त्या अनुषंगाने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

अशाच स्वरूपाची मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान सेलचे उपाध्यक्ष गौरीशंकर मुळे, कोल्हापूर किसान काँग्रेसचे अध्यक्ष रंजीत माने पाटील, काँग्रेस कमिटीच्या क्रिडा विभागाचे उपाध्यक्ष शिरीष खताळ, बालाजी नाईकल, किसान काँग्रेसचे सरचिटणीस अनिल पाटील, माधव पाटील आदींनी केली असल्याचे विजयकुमार हत्तुरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.