Type Here to Get Search Results !

केबलने गळा आवळून पत्नीचा खून


सोलापूर : मद्यपि नवऱ्याने घरगुती भांडणाचा राग मनात धरुन त्याच्या पत्नीचा केबलने गळा आवळून खून केला. ही खळबळजनक दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे बुधवारी सायंकाळी घडली. सौ. रेखा शरणबसप्पा हिरोळे असं मृताचं नाव आहे. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात शरणबसप्पा हिरोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडोरी येथील रहिवासी शिवलिंग चनबसप्पा नंदर्गी यांची मुलगी, रेखा हिचा विवाह २००९ मध्ये यत्नाळ येथील शरणबसप्पा हिरोळे याच्याशी झाला. त्यांना आजमितीला १२ वर्षीय समर्थ व मुलगी अंबिका (वय-१० वर्ष) अशी अपत्यं आहेत. शरणबसप्पा हिरोळे हा दारु पिऊन लहान-सहान निमित्त शोधून सौ. रेखाला वेळोवेळी मारहाण करीत होता. त्याच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालावा म्हणून उभयतांना वेळोवेळी समजावून सांगितले होते. साधारणतः एक महिन्यापूर्वी देखील विनाकारण बेदम मारहाण केल्याने सौ. रेखा, तिच्या मुलांसह माहेरी राहणेस आली होती. 

त्यानंतर सुमारे २० दिवसापुर्वी गावातील पंच परमेश्वर हुळ्ळे, सिध्दु उमराणी, मलका सावकार व यत्नाळ येथील मल्लिकार्जुन कोणदे, विजयकुमार हिरापुरे असे आले होते. परंतु शरण बसप्पा याची सुधारण्याची लक्षणे नसल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी सौ. रेखाला सासरी पाठवले नव्हते. गेल्या १५ दिवसात तो दोन-तीन वेळा सासरी जाऊन सर्वांची विनवणी करु लागल्याने सौ. रेखाला त्याच्यासोबत पाठवले होते. रेखा, तिच्या मुलीसह सासरी गेली. मुलगा समर्थ, मात्र वडील मारहाण करतात, म्हणून तो आजोळीच थांबला. 

बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी शरणबसप्पा हिरोळे याने त्याची पत्नी सौ. रेखा हिच्याशी घरगुती कारणावरून तक्रार करून, तिच्या गळ्याला केबलने आवळला. हृदयद्रावक प्रकार रात्री, तिच्या माहेरी गावच्या पोलीस पाटलाकरवी कळविण्यात आला. त्यावेळी घटनास्थळी भेट दिलेले पोलीस व दशरथ कोणदे यांनी सौ. रेखा हिस पुढील उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे पाठवून दिले. तेथे डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार शरणबसप्पा उर्फ संजय महादेव हिरोळे याच्याविरुद्ध वळसंग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.