सोलापूर : पूर्व विभागात नागरिकांमध्ये रोगराई पसरवणारा हवामान खात्यासमोरील W.I.T. कॉलेज शेजारील कचरा डंपिंग त्वरीत बंद करण्यात यावे, अन्यथा सह्यांची मोहीम राबविण्यात येईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर मध्य विधानसभा समन्वयक निरंजन बोध्दूल यांनी मनपा आयुक्त शितल उगले यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांचे रक्षण करणे, रोगराई मुक्त करणे, हे कर्तव्य आहे. यासाठी महाराष्ट्र शासन व मनपा लाखो रुपये खर्च करते, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांत रोगराई पसरवण्याचं काम पूर्व विभागात व शहरात विविध ठिकाणी कचरा डंपिंग सुरु आहे. पूर्व विभागातील ताना-बानासमोर एकीकडे हवामान खाते आहे अन् एकीकडे W.I.T. कॉलेज, एकीकडे वल्याळ मैदान (वॉकिंग ट्रॅक) तसेच एकीकडे नॅशनल हायवे आणि एकीकडे दाट लोकवस्ती असलेल्या पूर्व भागातील कचरा डंपिंग या ठिकाणी सुरु आहे. या कचरा डंपिंगमुळे येणाऱ्या जाणाऱ्या व येथील स्थानिक रहिवाशांना रोगराई निर्माण होत आहे.
सकाळी व सायंकाळी काही नागरिक व महिला शुद्ध हवा घेण्यासाठी व आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी वॉकिंगला येत असतात, काही युवक क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. शेजारीच W.I.T. कॉलेज असून या कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या कचरा डंपिंगमुळे भयानक त्रास होत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिक नागरीक कचरा डंपिंगच्या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत, अशी उ. बा. ठाकरे शिवसेना शहर मध्य विधानसभा समन्वयक निरंजन बोध्दूल यांची तक्रार आहे.
या कचरा डंपिंगचा नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून कचरा डंपिंगची व्यवस्था शहराच्या बाहेर असणे आवश्यक आहे, मात्र महानगरपालिकेच्या वतीने नियमाची पायमल्ली होत असेल तर ही बाब नागरी आरोग्यासाठी हितावह नाही. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी, पूर्व विभागातील हवामान खात्यासमोरील कचरा डंपिंग त्वरीत बंद करावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येईल, याची नोंद व गंभीर दखल घ्यावी, अशी विनंतीही निरंजन बोध्दूल यांनी केली आहे.