Type Here to Get Search Results !

मुदतवाढ... ! शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


सोलापूर : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी  03 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृष‍ि अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

 शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सन 2023-24 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पध्दतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषि प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, न्युझीलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑस्टेलिया, सिंगापूर इ. संभाव्य देशाची निवड करण्यात आली आहे. अभ्यास दौऱ्याकरिता लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा असावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र 1) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकऱ्याचे वय 25 ते 60 वर्षे असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे.

शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. 1 लाख रुपये प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल.

या दौऱ्याकरिता जिल्ह्याला 3 शेतकऱ्यांचे लक्षांक असून यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार शेतकऱ्यां निवड केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन, 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज केलेले शेतकरी बांधव यांनी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी 1.00 वाजता उपस्थित रहावे. प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समिती समोर सोडत काढण्यात येणार आहे. असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले  आहे.